प्रतिनिधी / बेळगाव
मराठा क्रांती मोर्चादरम्यान बेळगाव येथे कोल्हापुरातून टी-शर्ट आणून विक्री करण्यात येत होती. त्यावर ‘मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे’ असा स्लोगन होता. त्यामुळे विक्री करणाऱया शहाजीराजे भोसले याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. खटल्याची सुनावणी येथील प्रथमवर्ग तृतीय न्यायदंडाधिकारी येथे सुरू आहे. मात्र, हा खटला 1 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चा बेळगावमध्ये काढण्यात आला. यात हजारोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला होता. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी टी-शर्ट, टोप्या, ध्वज खरेदी करण्यात आले होते. कोल्हापुरातून शहाजीराजे भोसले हा टी-शर्ट विक्री करण्यासाठी बेळगावात आला होता. रंगुबाई पॅलेसमध्ये टी-शर्ट विक्री करण्यात येत होती. त्यामुळे शहाजीराजे भोसले आणि मोर्चाचे आयोजक प्रकाश मरगाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप करत हा गुन्हा नोंदविला होता. खटल्याची सुनावणी बुधवारी होती. मात्र, हा खटला पुन्हा पुढे ढकलला असून 1 मार्च रोजी खटल्याची सुनावणी होणार आहे. या खटल्यात कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे काम पाहत आहेत.