क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सामनाअधिकारी आणि रेफ्रींशी असभ्य वर्तन केल्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने मुंबई सिटी एफसीचा कप्तान हय़ुगो बुमूस याच्यावर आणखी दोन सामन्यांची बंदी घातली असून दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. 8 फेब्रुवारी रोजी बांबोळीतील जीएफसी स्टेडियमवर झालेल्या एफसी गोवाविरूद्धच्या सामन्यात बुमूसने रेफ्रींशी असभ्य गैरवर्तन केले होते.
या सामन्यात त्याला चौथे एलो कार्ड मिळाले होते. असभ्य वर्तनामुळे त्याला रेड कार्डही देण्यात आले. यामुळे त्याला आता चार सामने खेळायला मिळणार नाहीत. मुंबई सिटीच्या उर्वरीत लीग सामन्यात त्याला आता खेळायला मिळणार नाही, मात्र प्ले-ऑफ लढतीसाठी तो उपलब्ध असेल. शिस्तपालन समितीने मात्र एफसी गोवाच्या एदू बेडियाला क्लिन चिट दिली आहे. चेन्नईन एफसीच्या दीपक टांग्रीशी गैरर्वतन केल्याचा आरोप त्याच्यावर होता.