- 400 पेक्षाअधिक लोकांची अग्निशमन दलाकडून सुटका
ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये काल रात्री भीषण आग लागली. गेल्या दहातासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत मॉलमध्ये अडकलेल्या 400 हून अधिक नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलला रात्री 9 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील मोबाईल दुकानाला लागलेली आग संपूर्ण मॉलभर पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉलची घोषणा करण्यात आली. आग विझवण्यासाठी गेल्या दहा तासांपासून अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सिटी सेंटर मॉलमध्ये जवळपास 200 हून अधिक दुकाने आहे. या सर्व दुकानांमध्ये मोबाईल ॲक्सेसरीजची दुकाने जास्त आहेत. त्यामुळे या आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
काल रात्री 9 वाजताच्या दरम्यान ही आग लागलेली होती. सुरुवातीला एका दुकानाला लागलेली आग आता संपूर्ण मॉलमध्ये पसरली आहे. मॉलच्या आजूबाजूच्या परिसरात आगीमुळे धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
दरम्यान, आगीची सध्याची स्थिती पाहिली तर, आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. 40 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. अंदाजे 3,500 रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच असलेल्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. आगीची तीव्रता लक्षात घेऊन बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.