ऑनलाईन टीम / मुंबई :
चेंबूर-शिवडी बेस्ट डेपो येथे मुंबई गुन्हे शाखा 4 च्या पथकाने एका नायझेरियन नागरिकाकडून 5 किलो एमडी आणि 200 गॅम कोकेन जप्त केले आहे. या ड्रग्जची किंमत जवळपास 5 कोटी 40 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पोलिसांनी एका नायझेरियन नागरिकाला अटक केली आहे.
दिल्लीहून एक नायझेरियन नागरिक ड्रग्ज घेऊन चेंबूर-शिवडी बेस्ट डेपो येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी एक नायझेरियन नागरिक एका पर्समध्ये 500 ग्रॅमच्या पुडय़ा बनवून विकत होता. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे 5 किलो एमडी आणि 200 गॅम कोकेन आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करुन संबंधित नागरिकाला अटक केली आहे. शनिवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.