ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास एनसीबीकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) जाण्याची शक्यता आहे. लवकरच यासंदर्भात नोटीफिकेशन निघू शकते. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन रोज नवनवे आरोप होत आहेत. या प्रकरणातील एक साक्षीदार प्रभाकर साईल याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला होता. त्यानंतर प्रभाकर साईल हा भूमिगत झाला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही वानखेडे यांच्यावर विविध आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. एनआयएची टीम नुकतीच एनसीबीच्या विभागीय कार्यालयात आली होती. येथे एनआयएने दोन तास माहिती घेतली. दरम्यान, एनआयएकडे तपास सोपवण्याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच निघू शकते. मात्र, या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यास एनसीबी आक्षेप घेऊ शकते. कारण एनआयएचा हा हस्तक्षेप एनसीबीच्या अधिकारक्षेत्राला कमकुवत करू शकतो, असे सूत्रांनी म्हटले आहे.