एलन मस्क अन् बेजोसच्या पंक्तीत अंबानी -100.6 अब्ज डॉलर्सची मालमत्ता
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे टेस्लाचे एलन मस्क आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या पंक्तीत सामील झाले आहेत. अंबानी यांच्या मालमत्तेचे मूल्य 100.6 अब्ज डॉलर्स इतके आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सकडून प्रसिद्ध अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मुकेश अंबानी जागतिक धनाढय़ांच्या मानांकनात 11 व्या स्थानावर आहेत.
चालू वर्षात त्यांच्या मालमत्तेत 23.8 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. दूरसंचार, रिटेल आणि ऊर्जा क्षेत्रात अंबानी यांचा उद्योगसमूह कार्यरत आहे. 2020 मध्ये त्यांनी 27 अब्ज डॉलर्सचा निधी त्यांनी जियो टेलिकॉममधील हिस्सेदारी विकून मिळविला होता.
मस्क अग्रस्थानी
एलन मस्क यांच्याकडे सद्यकाळात 222.1 अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. तर जेफ बेजोस यांच्या मालमत्तेचे मूल्य 190.88 अब्ज डॉलर्स इतके आहे. बिल गेट्स चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 127.9 अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. वॉरेन बफे 103 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह दहाव्या क्रमांकावर आहेत.