शनिवारी अहवालात 750 बाधित, 213 जणांची कोरोनावर मात
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्गातील दुसऱया लाटेत जिल्हा पहिल्या लाटेच्या तडाख्यापेक्षा अधिक पॅनिक झाला. दैनंदिन 2 हजारांच्या आकडेवारीने नागरिक भयकंपीत झाले होते. आकडेवारीच्या खेळाने आणि बेड मिळत नसल्याने जिल्हा हतबल होत असतानाच पेंडिग आकडेवारीतील कोरोना अपलोट घोटाळा ‘तरुण भारत’ने बाहेर काढल्यानंतर वास्तव समोर आले. जिल्हय़ाला लॉकडाऊनमधून शिथीलता मिळाली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी फक्त 213 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, हा रविवारचा आकडा अत्यल्प असला तरी उद्या सोमवारी त्याच्या दुप्पटीहून जास्त कोरोनामुक्त असतील.
दरम्यान, जिह्यात शनिवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 750 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 22 बाधितांचा मृत्यु झाला. तर रविवारी सायंकाळी फक्त 213 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
मुक्त आज अत्यल्प, उद्या असेल दुप्पट
‘तरुण भारत’ ने कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून नागरिकांना ‘अचूक बातमी’च्या माध्यमातून वास्तव माहिती दिली आहे. कोरोनापासून घ्यावयाच्या काळजीबाबत प्रबोधन करण्यापासून ते प्रशासनासह सामाजिक संस्था, व्यक्तींनी जो लढा कोरोनाविरुध्द दिला त्यांचे योगदानही मांडले. मात्र, ज्यावेळी चूक दिसली तेव्हा आकडेवारीतील घोळही मांडला हा शब्द प्रपंच सर्वांच्या भल्यासाठी होता व राहील. तद्वतच रविवारी ज्या पध्दतीने अत्यल्प कोरोनामुक्ती समोर आलीय ती सोमवारी रविवारच्या आकडेवारीच्या दुप्पटीपेक्षा जास्त असेल याच अचुकतेचा अनुभव येईल.
750 जणांचा अहवाल बाधित
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. कराड 186 (25,784), सातारा 159 (39,071), खटाव 149 (18,779), पाटण 44 (8,008), जावली 28 (8,337), खंडाळा 34 (11,495), कोरेगांव 43 (16,172), माण 42 (12,696), फलटण 34 (27,865), वाई 21 (12,359), महाबळेश्वर 1 (4,210) व इतर 9 (1,241) असे आज अखेर एकूण 1,86,071 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
जिल्हय़ात 22 बाधितांचा मृत्यू
शनिवारी मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. कराड 8 (756), सातारा 5 (1,190), खटाव 3 (472), कोरेगांव 1 (372), माण 1 (250), पाटण 2 (187), फलटण 1 (277), वाई 1 (324) जावली 0 (185), महाबळेश्वर 0 (44), खंडाळा 0 (147), व इतर 0, असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 4,202 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ात 2,896 बेड रिक्त
आजमितीस जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,860 एकूण बेड संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,964 एवढी असून हॉस्पिटलमध्ये 2,896 बेड रिक्त आहेत. कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 84 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 238, ऑक्सिजनसह 2,035 बेड आणि ऑक्सिजनविना 539 असे 2,896 बेड रिक्त आहेत.
रविवारी 539 जण ठरले लस लाभार्थी
जिल्हय़ात लसीकरणाचा वेग मंदावलेला असला तरी उपलब्ध साठय़ानुसार लसीकरण सुरु आहे. लसीकरणाची आकडेवारी कासवाच्या गतीने वाढत असून रविवारी फक्त 539 जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 6 लाख 79 हजार 64 झालीय. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 43 हजार 592 झाली असून एकूण लस घेतलेल्यांची संख्या 8 लाख 22 हजार 656 एवढी झालीय.