चिखली, कासावलीतील इस्पितळेही कार्यरत करणार
प्रतिनिधी / पणजी
तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पेडणे, डिचोली, वाळपई, काणकोण आणि कुडचडे येथे लवकरच इस्पितळे उभारण्यात येणार आहेत. त्याशिवाय चिखली व कासावलीतील इस्पितळेही कार्यरत करण्यात येणार असून ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कोविड केअर सेंटरचेही इस्पितळात रुपांतर करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर, मुख्य सचिव परिमल राय, आरोग्य सचिव, आरोग्य संचालक यांच्यासह सीएमसी आणि सीएमओ सल्लागार उपस्थित होते. बैठकीत प्रथम मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
इस्पितळात जागा मिळणे बनले कठीण
सध्या सर्वच इस्पितळातील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी नवीन आणि खास करून प्रकृती चिंताजनक बनलेल्या रुग्णांना इस्पितळात जागा मिळणे कठीण बनले आहे. अशा रुग्णांना चांगली सेवा मिळण्याची गरज आहे. त्याशिवाय ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांना वेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत करून इस्पितळातील खाटांचा वापर गंभीर रुग्णांसाठी करण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
गृह विलगीकरणातील रुग्णांवर लक्ष द्यावे
उपचारातील दुर्लक्षामुळे अखेरच्या क्षणी रुग्णांकडून इस्पितळात धाव घेण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यावर नियंत्रण येण्यासाठी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर खास नजर ठेवण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी राज्यातील कोविड स्थिती आणि ऑक्सिजन उपलब्धतेबाबत महत्वाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी घेतली. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी महत्वाचे निर्देश देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळात ऑक्सिजनची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर यंत्रणा कामाला लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले.