प्रतिनिधी / सांगली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगली जिल्हा दौरा निश्चित झाला असून ते सोमवारी 2 ऑगस्टला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता पलूस येथे कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर पावणे अकरा वाजल्यापासून ते अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज व सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी तसेच पूरग्रस्तांच्या भेटीगाठी घेऊन दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक घेतील.
दोन वाजता कवलापूर येथील विमानतळावरून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. त्यांच्यासमवेत पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण अण्णा लाड, आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेना संपर्क नेते नितीन बानगुडे पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, मिलिंद नार्वेकर ही उपस्थित राहणार आहेत.