गोकाक पोटनिवडणुकीवेळी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 2019 मध्ये गोकाकसह राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली होती. गोकाकमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान वीरशैव समाजाच्या नावाने मतयाचना करून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यावर आहे. या प्रकरणी गोकाक जेएमएफसी न्यायालयाने येडियुराप्पा यांना समन्स बजावले असून 9 सप्टेंबर पूर्वी सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना दिली आहे.
काँग्रेस आणि निजदमधील आमदारांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील 14 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. गोकाक मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार रमेश जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी 23 नोव्हेंबर 2019 रोजी गोकाकमधील वाल्मिकी क्रीडांगणावर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येडियुराप्पा यांनी भाषण करताना वीरशैव-लिंगायत समाजाची मते विखुरली जाऊ नयेत, असे आवाहन केले होते. यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून येडियुराप्पा यांच्याविरोधात 26 नोव्हेंबर 2019 रोजी गोकाक शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणी तपास अधिकाऱयांनी गोकाक शहर जेएमएफसी न्यायालयात बी रिपोर्ट सादर केला होता. मात्र, न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळून लावला असून येडियुराप्पांना 9 सप्टेंबरपूर्वी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना दिली आहे.