प्रतिनिधी / बेंगळूर
7 एप्रिलनंतर चित्रपटगृहांना 100 टक्के आसन भरतीची मुभा देण्याची मागणी चित्रपट निर्मात्यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नवी नियमावली जारी केली होती. त्यानंतर कन्नड चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेत नाराजी व्यक्त केल्याने राज्य सरकारने 7 एप्रिलपर्यंत चित्रपटगृहात 100 टक्के प्रेक्षक प्रवेशाची अट लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो अवधी बुधवारी संपत असल्याने बेंगळूरच्या सदाशिवनगरमधील निवासस्थानी चित्रपट निर्माता संघाच्या पदाधिकाऱयांनी मंत्री सुधाकर यांची भेट घेऊन गुरुवारपासून 100 टक्के आसन भरतीची मुभा देण्याची मागणी केली.
यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सुधाकर यांनी, चित्रपटांसाठी आगाऊ बुकींग करण्यात आल्याने सदर रक्कम परत करणे शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारने 7 एप्रिलपर्यंत 100 टक्के आसन भरतीची मुभा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्याबाबत भरवसा दिला आहे.