वार्ताहर /किणये
गेल्या दोन दिवसापासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे पहिला बस स्टॉप, नेताजी गल्ली, मुचंडी येथील शेखर भरमा कुंडेकर यांचे राहते घर कोसळून त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान त्यांचे घर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शेखर कुंडेकर यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. अशा परिस्थितीत त्यांचे राहते घर कोसळल्यामुळे आता आसरा घ्यायचा कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. घर कोसळल्यामुळे जीवनावश्यक साहित्याचेही नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन शेखर कुंडेकर यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गावातील नागरिकांतून होत आहे.