प्रतिनिधी/ पणजी
मुरगाव पालिकेच्या पहिला महिला नगरसेवक मारिया जोयफा डिसोझा यांचा राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या हिरक महोत्सवी वाढदिनाचे औचित्य साधून हा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांची उपस्थिती होती.
वास्को नागरिक समितीतर्फे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मारिया डिसोझा यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रीमती मारिया डिसोझा 1972 मध्ये मुरगावच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. डिसोझा कुटुंबाचा राजकीय प्रवास इथूनच सुरू झाल्याचे त्यांचे बंधू जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले. त्यानंतर आपण दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलो व दोन्ही वेळी मंत्रीपद मिळविले. आपली पत्नी नगरसेवक म्हणून निवडून आली व सध्या आपले बंधू नगरसेवक आहेत. पण खरा राजकीय प्रवास मारिया यांनी सुरू केला, असे ते म्हणाले.
महिलांच्या सबलीकरणाच्या दिशेने पावले टाकत पहिल्या नगरसेवक बनलेल्या मारिया डिसोझा यांचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी कौतूक केले. राजकारणाव्यतिरिक्त गोमेकॉमध्ये नर्स म्हणून त्यांनी सेवा बजावली. डॉक्टरी पेशासारखा प्रामाणिक पेशा दुसरा नाही. त्याच्या कार्यातून नव्या पिढीने शिकण्याची गरज आहे, असेही आलेमाव म्हणाले. यावेळी डॉ. शांताराम सुर्मे, डॉ. ज्यूड रॉड्रीग्स, डॉ. मारिया रॉड्रिगीश, नर्स सुर्मे, तसेच नगरसेवक पास्कॉल डिसोझा, क्लेमेंत डिसोझा तसेच अन्य विविध क्षेत्रातील व्यक्तिंची उपस्थिती होती. यावेळी आपल्या सत्काराबद्दल बोलताना मारिया यांनी आभार व्यक्त केले व आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद दिले.