प्रतिनिधी/ वडूज
अलिकडच्या काळात नवरी मुलगी मिळत नसल्याच्या कारणावरुन गावोगावी अनेक तरुणांचे विवाह रखडले आहेत. अश्या परस्थितीत मुलांना रोख पैसे, दाग दागिने देवून परजिह्यातील मुलींचा शोध घ्यावा लागत आहे. अश्या प्रकारे लग्न झालेल्या काही मुली सासरी चांगल्या प्रकारे संसार करत आहेत. तर काही मुली व मध्यस्थाकडून तात्पुरते लग्न करुन वराकडील मंडळींची फसवणूक करण्याच्या घटना घडत आहेत. असाच प्रकार खटाव तालुक्यातील भुरकवडी या गावात घडला आहे. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तत्काळ कार्यवाही करत सात आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, भुरकवडी येथील विशाल दिनकर जाधव हा 30 वर्षाचा शेतकरी युवक आहे. त्याच्या बरोबर पुजा शिवाजी शिंदे रा. करंडी (ता. शिरुर) येथील या युवतीचे लग्न लावून देतो असे सांगत सात जणांनी संगणमत करुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे 1 लाख 90 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पुजा शिंदे हिच्यासह करीश्मा महादेव सासने रा. करंडी, वैशाली सोमनाथ ताकवले (रा. हडपसर), सचिन गुलाबराव घाडगे रा. खटाव, रविंद्र सुदाम जाधव रा. बसाप्पाचीवाडी ता. जि. सातारा, रोशन इन्नुस तांबोळी, इन्नुस अमीर तांबोळी रा. रामनगर हडपसर, वर्षा रमेश फडतरे रा. सिध्दार्थनगर मोहोळ या सात जणांविरोधात विशाल जाधव यांनी गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव महामुनी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर व सहकार्यांनी गतीने तपास करुन वरीलपैकी पुजा शिंदे, करिश्मा सासने, वैशाली ताकवले, अनिकेत मोहन घोलप रा. बाळे ता. उत्तर सोलापूर या आरोपींना अटक केली आहे. संशयितांना वडूज येथील न्यायालयात हजर केले असता मंगळवार दि. 18 पर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या कारवाईत पोलीस नाईक शिवाजी खाडे, पोलीस कॉन्स्टेबल आनण्णाराव मारेकर, संदिप शेडगे, महिला कॉन्स्टेबल विद्या जाधव आदिंनी सहभाग घेतला.