दत्तक मुलाला काहीच कमी केले नव्हते, नशीब याहून काय खोटे असू शकते ? : कोलमडलेले वडील मंगलदास नाईक यांचा सवाल
प्रतिनिधी /कुडचडे
सोमवारी धडे, सावर्डे येथे प्रथमेश नाईक याने आपल्या प्रेयसीसाठी स्वतःची आई मनीषा नाईक हिचा खून करण्याच्या घटनेमुळे कुडचडे, सावर्डे परिसरांत एकच खळबळ माजलेली आहे. मुलाने संधी साधून खून केल्याचे उद्गार वडील मंगलदास नाईक यांनी काढले आहेत. काहीच कमी न केलेल्या मुलाने त्याच्या आईची अशी क्रूर पद्धतीने हत्या करणे म्हणजे आपले नशीबच खोटे म्हणायला हवे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
अपत्य नसल्यामुळे अत्यंत लहान असताना प्रथमेश याला दत्तक घेतले होते व आपले जीवन आनंदात पुढे सरकत होते. पण अचानक प्रथमेश त्या मुलीच्या संपर्कात आला व घरात वाद घालण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आपली पत्नी मनीषा व आपण त्याला या मुलीचा संपर्क सोड म्हणून बऱयाच वेळा सांगितले होते. पण त्यावर त्याने कोणतेच पाऊल उचलले नाही. 25 सप्टेंबर, 2021 रोजी तो घरातून पळून गेला. त्यानंतर तो घरी आलाच नाही. ज्या दिवशी तो घर सोडून गेला त्याच्या अगोदर आईला कोणताच त्रास होता कामा नये असे सांगून तो गेला होता. अशा या मुलाने आपल्या प्रेयसीसाठी अशा प्रकारे आपल्या आईची निर्घृणपणे हत्या करणे याहून नशीब खोटे काय असू शकते, असा सवाल मंगलदास यांनी केला.
मुलगा घरी येण्यासाठी आणली होती बुलेट
मुलाला हव्या असलेल्या वस्तू देण्यात कोणतीच हयगय आपण कधीच केली नाही. यात हल्लीच प्रथमेश घरी यावा म्हणून नवीन बुलेट सुद्धा आणून दारात ठेवली होती. पण त्याने प्रेयसीच्या नादी लागून आई-वडिलांच्या प्रेमाला कधीच महत्त्व दिले नाही. अशा या क्रूर व्यक्तीला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, असे मंगलदास म्हणाले.
दरवाजा उघडा राहिल्याने मिळाली संधी
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, एरव्ही घर एकदम शेवटच्या टोकाला असल्यामुळे प्रत्येक दरवाजा बंदच राहायचा. पण सोमवारी पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी कपडे वळत घालण्यात येत होते तेथे जाण्याकरिता असलेला दरवाजा खुला राहिल्याने प्रथमेश याने घराच्या बाहेरून असलेल्या पायऱयांवरून घरात प्रवेश केला व हा खून केला, असे दिसून आले आहे.
आरडाओरडा चालल्याची माहिती मिळाली होती
मंगलदास नाईक हे सोमवारी सकाळी सावर्डे, तिस्क येथील दुकानात गेले. त्यानंतर अंदाजे 11.30 च्या दरम्यान परिसरातील एका व्यक्तीने त्यांच्या घरात आरडाओरडा चालल्याची माहिती दिली होती. घर जंगलाजवळ असल्यामुळे रोज माकड येत असत. त्यामुळे मनीषा त्याचअनुंषगाने आरडाओरडा करत असावी असा अंदाज मंगलदास यांनी बांधला वड ते दुकानातच राहिले. ज्या वेळेस ते दुपारी 1 वा. घरी परतले तेव्हा मुख्य दरवाजा पत्नी मनीषाने खुला केला नाही. कित्येक वेळा हाका मारून सुद्धा दरवाजा खुला केला गेला नाही. त्यावेळी त्यांनी शेजाऱयांना बोलावून आणले तसेच पोलिसांनाही कळविण्यात आले. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला असता मनीषा हिचा खून झाला असल्याचे दिसून आले.
हत्या करताना मनीषा हिच्या पाठीत कित्येक वेळा लोखंडी हत्यार घुसविले गेले व डोक्मयावर जोरदार वार करण्यात आले असे उघडकीस आले आहे. आईचा खून स्वतः आपण व प्रेयसीने केल्याची कबुली मुलगा प्रथमेश याने पोलीस स्थानकात दिल्याची माहिती मिळालेली आहे. सदर प्रेयसी ही अल्पवयीन असून हा कट नेमका कुणी रचला व पैशांच्या ओढीतून तो रचला गेला का याविषयी सावर्डे व कुडचडे परिसरात जोरदार चर्चा चालली आहे.