देवी केळबाई जाणार आज मयेत बहिणीच्या भेटीला : मयेची देवी करणार वचनपूर्ती
प्रतिनिधी /डिचोली
आपली लहान बहिण मुळगावातील केळबाईला थोरली बहिण मयेतील केळबाई देवीने दिलेल्या वचनाची पूर्तता आज मयेतील देवी करणार आहे. मयेतील वंडय़ार या ठिकाणी मयेतील थोरली बहिण देव केळबाईने मुळगावातील आपल्या लहान बहिण देवी केळबाईला आपल्यासमवेत मयेत तीन दिवस पाहुणचाराचे वचन दिले होते. याच सोहळय़ाला मुळगावातील “पेठेची जत्रा” असे म्हटले जाते. हि जत्रा आज बुध. दि. 6 एप्रिल रोजी रात्री साजरी करण्यात येणार असून मुळगावातील देवी केळबाई आपल्या बहिणीकडे वाजत गाजत जाणार आहे. व्रतस्थ धोंडगणांनी आपल्या सोवळय़ा व्रताला प्रारंभ केला असून काल मंगळवारी (दि. 5) धोंडगणांचे “व्होडले जेवण” झाले.
वंडय़ार मये येथे सात बहिणी व एक भाऊ खेतोबा यांच्यात झालेल्या वादानंतर देवी लईराईने शिरगाव गावात वास्तव्य करण्यास पसंत केले. थोरली बहिण केळबाईने मये गाव वास्तव्यासाठी स्विकारला. तर लहान बहिण केळबाईला थोरल्या बहिणीने मुळगावात जाऊन वास्तव्य करण्याची सुचना केली. पण मुळगावात वास्तव्य करून असलेल्या मोठमोठय़ा देवतांच्या सहवासात आपली सदैव तुझ्यावर कृपादृष्टी असणार आणि आपण वर्षातून एकदा म्हणजेच चैत्र शुध्द पंचमीला तीन दिवसांच्या पाहुणचारासाठी तुला मयेत आपल्यासमवेत तीन दिवसांच्या पाहुणचाररासाठी आणणार, असे वचन थोरली बहिण मयेतील देवी केळबाईने लहान बहिण मुळगावातील देवी केळबाईला दिले होते. त्या वचनानुसार आज शनिवारी चैत्र शुध्द पंचमीच्या दिवशी मुळगावातील देवी केळबाईला मयेत आणण्यासाठी मयेतील देवी केळबाई जाणार आहे.
या जत्रोत्सवाच्या पूर्वपरंपरेनुसार आज बुधवारी (दि. 6) रात्री मयेतील देवी केळबाईचे मोडपुरूष, चौगुले मानकरी व मोठय़ा संख्येने ग्रामस्थ मुळगावातील देवी केळबाईला नेण्यासाठी मुळगावात दाखल होणार. यावेळी शिरगाव, डिचोली, बोर्डे, वायंगिणी, मोरजी या गावातील चौगुले मानकरीही मुळगावात हजर राहतात. मयेतील चौगुले मानकरी यांच्याकडून मंदिरात देवीची पेठ सजवली जाते. त्यानंतर विधीवतपणे पूजा करून गाराणे घालून पेठ मंदिराबाहेर सभामंडपात आणली जाते. तेथे पुन्हा गाराणे घालण्यात आल्यानंतर पेठ सभामंडपात प्रदक्षिणा मारते आणि सुसाट वेगाने आपल्या पारंपरिक वाटेतून मयेच्या दिशेने प्रयाण करणार. मुळगावातून मयेत येत असताना देवी आपल्या गावातील सर्व देवतांचा निरोप घेते. व वाटेत मिळणाऱया सर्व देवतांना व लोकांना कौल देत मयेतील वंडय़ार येथे दाखल होणार. तेथे पेठ काही काळासाठी सोडून अल्प विश्रांती घेणार आणि नंतर केळबाईवाडा मयेतील थोरली बहिण देवी केळबाईच्या मंदिरात दाखल होणार. या मंदिरात थोरली बहिण देवी केळबाईची पेठ सजविण्यात आल्यानंतर दोन्ही पेठा एकत्रितपणे गावकरवाडा मये येथील चव्हाटा येथे जाण्यासाठी वाजत गाजत असंख्य धोंडगणांच्या साथीने निघणार. चव्हाटा येथील पवित्र स्थानावर दोन्ही पेठा नंतर तीन दिवसांसाठी उघडून ठेवल्या जातात.
या प्रसिध्द अशा पेठेच्या जत्रोत्सवाला सकाळीपासून मुळगाव गावात प्रारंभ होणार असून मंदिरात विविध धार्मिक विधी होणार आहेत. या जत्रेतील सोवळे व्रत पाळणाऱया व्रतस्थ धोंडगणांच्या सोवळय़ा व्रताला गुढीपाडव्याच्या दिवसापासून प्रारंभ झाला आहे. हे सर्व धोंडगण जत्रेच्या दिवशी फराळ ग्रहण करतात. दुपारी देवीच्या तळीत स्नान करून धोंडगणांनी आणि देवीच्या मोडपुरूषाने देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते फराळ ग्रहण करणार.