स्वतःवरच करविले अंत्यसंस्कार
चिलीमध्ये कोरोनाकाळात झालेल्या मृत्यूंचा एका महिलेवर इतका प्रभाव पडला आहे की तिने स्वतःवर बनावट अंत्यंसंस्कार करवून घेतले आहेत. यावेळी महिलेने स्वतःच्या सर्व मित्रांना बोलावून स्वतःच्या कल्पनेविषयी सांगितले आहे. या महिलेने स्वतःच्या या बनावट अत्यंसंस्कारासाठी 710 पाउंड्स म्हणजेच सुमारे 75 हजार रुपये खर्च केले आहेत.
59 वर्षीय मायरा अलोंजो सँटियागो शहरात राहतात. मागील काही महिन्यांपासून कोरोनामुळे होत असलेले मृत्यू पाहून त्या स्वतःच्या अंत्यसंस्काराविषयी खूपच विचार करू लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या अंत्यसंस्काराची तालीम करण्याचा विचार केला. तसेच स्वतःच्या मित्रांना या विचित्र कामासाठी तयार केले.
मायरा या सरावादरम्यान पांढऱया शवपेटीत काही तासांसाठी पडून राहिल्या. ही शवपेटी त्यांनी एक दिवसासाठी भाडेतत्वावर घेतली होती. याचबरोबर तेथे उपस्थित त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी खोटे अश्रूही ढाळले आहेत.
मायरा यांनी यावेळी पांढरा पोशाख घातला होता आणि एफ फुलांचा क्राउन परिधान केला होता. याचबरोबर त्यांनी स्वतःच्या नाकात कापसाचे बोळे घातले होते. सर्वसाधारपणे एका मृतदेहासंबंधी केली जाणारी सर्व व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. हा प्रकारच्या माझ्यासाठी स्वप्नासारखाच होता. आता मृत पावल्यावर मला कुठल्याही प्रकारच्या अंत्यसंस्काराची गरज नाही, कारण आता मी जिवंतपणीच सर्व अनुभवले असल्याचे मायरा यांनी म्हटले आहे. तर मायरा यांच्या या कृतीची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. काही लोकांनी मायरा यांच्यावर टीका केली आहे. स्वतःच्या या पब्लिसिटी स्टंटद्वारे त्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची चेष्टा करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.