काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना : मात्र, प्रवेश प्रक्रिया यंदापासूनच
हा तर नियमित प्रक्रियेचा भाग : डीन मोरे यांची माहिती
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेचे प्रक्रिया सुरू आहे. 17 सप्टेंबरला काही महाविद्यालयांची यादी वेबसाईटवर अप्रूव्ह म्हणून टाकण्यात आली. मात्र, ही नियमित प्रक्रिया आहे. नॅशनल मेडिकल कमिशन पुन्हा तपासणीसाठी 10 ऑक्टोबरनंतर येणार आहे. त्याआधी ज्या दोन त्रुटी आहेत, त्यासंदर्भात आपण दिल्लीत जाऊन अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे मान्यता रद्द झाल्याचा प्रश्नच नसून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 100 विद्यार्थ्यांची एमबीबीएसची बॅच सुरू होणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन मोरे यांनी ‘तरुण भारत’ला दिली. दहा ऑक्टोबरनंतर पुन्हा नॅशनल मेडिकल कमिशन पाहणीसाठी येणार आहे. त्यानंतर मेडिकल बोर्ड या प्रक्रियेला हिरवा कंदिल देणार आहे. त्यामुळे आणखी एक दिव्याला पार करावे लागणार आहे.
नॅशनल मेडिकल कमिशनकरवी 17 सप्टेंबरला प्रथम तपासणी झाली, त्या कॉलेजचे अप्रूव्हल करण्यात आले होते. त्यात सिंधुदुर्गचाही समावेश होता. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली, असे जाहीर करण्यात आले होते. पूर्वी मेडिकल कौन्सिलकरवी ही प्रक्रिया होत होती. मात्र, आता नॅशनल मेडिकल कमिशन गठीत केल्याने मान्यता प्रक्रियेत थोडा बदल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर
बोर्ड ऑफ गव्हर्नन्सला काही त्रुटी आढळल्याने त्या दूर करून दुसऱया टप्प्याची पाहणी 10 ऑक्टोबरला करण्याच्या सूचना केल्या. तीन आठवडय़ात त्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मान्यता रद्दचा प्रश्नच नाही. कॉलेजची अधिकृत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ त्रुटी दूर केल्यावर प्रवेश सुरू होणार आहेत. ज्या त्रुटी असतील त्या दूर करून आठ-दहा दिवसात आपण दिल्ली येथे स्वतः जाणार आहे. यंदापासून जिह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू होणार हे निश्चित आहे, असे मोरे यांनी सांगितले.
प्रथम तपासणीत मान्यता
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. तर आता मान्यता रद्द झाल्याच्या वावडय़ा उठत आहेत. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही. शासकीय मेडिकल कॉलेजला प्रथम तपासणीत मान्यता आहे. मात्र, आता पुन्हा समिती पाहण्यासाठी येणार असल्याने दोन त्रुटी आहेत, त्या दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार त्रुटी पूर्ण दूर करून पुन्हा अहवाल तयार केला जाणार आहे. अहवाल सादर झाल्यानंतर समिती 10 ऑक्टोबरनंतर पुन्हा पाहणीसाठी येणार आहे. ही समिती पाहणी करून गेल्यानंतर यंदापासून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
यंदापासून नॅशनल मेडिकल कमिशन
सिंधुदुर्गसोबतच सातारा, अलिबाग तसेच अन्य राज्यातील शासकीय मेडिकल कॉलेजना त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिह्याच्या शासकीय मेडिकल कॉलेजबाबत त्रुटी आहेत आणि मान्यता रद्द झाली, असे म्हणणे गैर आहे. ही एक प्रक्रिया आहे. नॅशनल मेडिकल कमिशन यंदापासून गठीत झाले असून त्यांनी काही शासकीय मेडिकल कॉलेजना परवानगी देताना पूर्णपणे सर्व
प्रक्रिया व सर्व त्रुटी दूर करूनच मान्यता दिली जात आहे. आता ज्या दोन त्रुटी आहेत, त्या तीन आठवडय़ात दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार दोन आठवडय़ात सर्व त्रुटी दूर करून अहवाल सादर करणार आहोत, असे मोरे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली, असे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेज कृती समितीने समाधान व्यक्त केले होते. असे असताना शासकीय मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द झाली, अशा वावडय़ा उठविण्यात आल्या. नॅशनल मेडिकल कमिशनने फक्त वेबसाईटवर राज्यातील शासकीय मेडिकल कॉलेज मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत, त्यांची यादी टाकली होती. दोन दिवसात या मेडिकल कॉलेजच्या त्रुटी दूर करा. त्यानंतर दुसरी समिती पाहणी करणार आहे, असे स्पष्ट केले आहे. आता या शासकीय मेडिकल कॉलेजच्या ज्या काही किरकोळ त्रुटी आहेत, त्याचा अहवाल गेल्यानंतर पुन्हा समिती दिल्ली स्तरावरून पाहणीसाठी येणार आहे. त्या समितीने अहवाल दिल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज यंदापासून सुरू होणार हे निश्चित आहे.