उर्वरीत जागेत आयआयटी प्रकल्प मेळावलीवासियांना 45 हजार मीटर जागा
प्रतिनिधी/ पणजी
गुळेली मेळावली येथील आयआयटीच्या नियोजित वादग्रस्त जागेतील 45,000 चौरस मीटर जागा तेथील मंदिर, व धार्मिक कार्यासाठी तेथील जनतेला सोडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गोवा दूरसंचार धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्या धोरणाअंतर्गत इंटरनेट जोडणी सुविधा सक्षम करावी म्हणून टॉवर उभारणी तसेच ऑप्टिकल फायबर केबल जोडणीकरीता एक खिडकी योजनेतून अनुमती देण्याचे ठरविले आहे. गोवा क्रीडा प्राधिकरणातील (साग) 740 कंत्राटी कर्मचाऱयांना सेवेत कायम करण्यावरही मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.
काल बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध निर्णयांची माहिती दिली.
तीन टप्प्यात होणार अंमलबजावणी
ते म्हणाले की, ऑनलाईन शिक्षण तसेच इतर ऑनलाईन कामांसाठी इंटरनेट सुविधा, ग्रामीण दुर्गम भागात मिळावी म्हणून गोवा दूरसंचार धोरण 2020 ला मंजुरी देण्यात आली असून त्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम खाते ठरवणार आहे. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण अशा तीन भागात या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.
सरकारी जागेत उभारणार नेटवर्क टॉवर्स
गोव्यात इंटरनेट सुविधेसाठी 300 टॉवर्सचे बांधकाम प्रलंबित असून ते सर्व या धोरणाअंतर्गत सरकारी जमिनीत बांधले जातील. त्यासाठी रु. 50000 व रु. 25000 अशी रक्कम संबंधित क्षेत्रातील पंचायती, पालिकांना भाडय़ाच्या स्वरूपात दिले जातील. एक खिडकी योजनेतून टॉवरसाठी परवाने देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
गुळेली आयआयटी प्रकल्पातील सुमारे 10 लाख चौरस मीटर जागेतील 45,000 चौरस मीटर जागा त्या प्रकल्पातून वगळण्यात आली असून ती धार्मिक कार्यासाठी ग्रामस्थांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आयआयटी प्रकल्प पुढे नेण्यासाठी हा निर्णय करण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. गरज पडली तर ती जमीन कायमस्वरूपी ग्रामस्थांना देण्यात येईल, असे ते म्हणाले.
चार खासगी कोविड रुग्णालयांना मंजुरी
फोंडा येथील उपजिल्हा हॉस्पिटल आता कोविड हॉस्पिटल करण्यात आले असून तेथे 27 रुग्णांना पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय मणिपाल, साळगावकर, मेडीकल रिसर्च सेंटर, अपोलो व्हिक्टर आणि हेल्थ वे या चार खासगी हॉस्पिटलात कोविड रुग्णांसाठी उपचार करण्यास मान्यता देण्यात आली असून तेथे कोरोना रुग्णांना पाठविण्यात येणार आहे.
रुग्णामागे दीड लाख रुपये मिळत नाहीत : मुख्यमंत्री एक कोरोना रुग्णामागे सरकारला दीड लाख रुपये मिळतात असा आरोप होत असून त्यासाठी कोरोनाचे रुग्ण वाढविले जातात ही गैरसमजूत आहे, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. अशा प्रकारे कोणी पैसे देत नाही आणि ते मिळतही नाहीत. त्यावर कोणी विश्वास ठेऊ नये. केंद्राकडून गोवा राज्याला 6 कोटी मिळाल्या आहेत, असेही ते म्हणाले.