कराडमध्ये 82 जणांवर कारवाई, चालवत नेले न्यायालयात
प्रतिनिधी/ कराड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतानाही पहाटे रस्त्यावर मॉर्निंग वॉकची हौस 82 जणांच्या चांगलीच अंगलट आली. सोमवारी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची मॉर्निंग वॉकची वरात पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आली. ताब्यात घेतलेल्या सर्वांना चालवत कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात नेण्यात आले. या सर्वांना मंगळवारी न्यायलायात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या देशभर संचारबंदी सुरू आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. कोणीही अत्यावश्यक काम सोडून घराबाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने पोलीस करत आहेत. मात्र तरीही काही लोक प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. कराड, मलकापूर, आगाशिवनगर, सैदापूर परिसरात अनेक लोक मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. कोरोनाची दहशत वाढलेली असताना मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी लोक मोठय़ा संख्येने बाहेर पडत आहेत. सोमवारी पहाटे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे यांनी वेगवेगळी पथके तयार करत पहाटे मॉर्निंग वॉक करणारांची धरपकड सुरू केली. कराडात प्रीतिसंगम बाग, शिवाजी स्टेडियम, वाखाण परिसर, आगाशिवनगर, मलकापूर, सैदापूर, विद्यानगर परिसरात अनेकजण मॉर्निंग वॉक, जॉगिंग करताना आढळून आले. युवक, युवतींसह वृद्धही होते. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात येत होते. दीड तासात तब्बल 82 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत चालवत नेण्यात आले. न्यायालयात गेल्यानंतर सर्वांना उद्या न्यायालयासमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या कारवाईने खळबळ उडाली होती. अजूनही बरेच लोक मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. तर काहीजण आगाशिव डोंगर, सदाशिवगड, वसंतगडावर जात आहेत. अशांवरही पोलिसांची नजर आहे. यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.