प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील दिवसेंदिवस जटील बनलेल्या मोकाट गुरांच्या समस्येचा बंदोबस्त करण्यासाठी भाजपाच्या शहर प्रतिनिधींनी लक्ष वेधूनही नगर परिषदेने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे शहरात रस्त्यांवर उभ्या असलेल्या मोकाट गुरांच्या गळय़ात नगर परिषद प्रशासनाच्या निषेधाचे बोर्ड घालून भाजपा कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले.
शहरात अगोदरच ट्रफिक जॅमची समस्या बळावत असताना आता तर रस्त्यांवर जागोजागी मोकाट गुरांचे कळप, ंउभे दिसत आहेत. त्यात कुत्र्यांचा वाढता उपद्रव. आणि आता त्यात भर काही खेचरे-घोडे यांचे हुंदडणे नागरिकांना त्रासदायक होऊ लागले आहे. या उनाड प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाने अपघातांचा मोठा धोका आहे. याकडे भाजपाच्या शहर प्रतिनिधींनी यापूर्वीच लक्ष वेधलेले आहे.
उनाड गुरांच्या या समस्येकडे शहर भाजपातर्फे आठवडाभरापूर्वीच नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. पण कार्यवाही करण्याचे आश्वासन हवेत विरल्याने सोमवारी भाजपाचे शहर प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक भैय्या मलुष्टे, राजीव कीर, ययाती शिवलकर, बंडय़ा भाटकर, मनोज कीर आदी कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरले. न.प.प्रशासनाने मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्या संदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे निषेधाचे फलक चक्क गुरांच्याच गळय़ात घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापुढेही मोकाट गुरांचा बंदोबस्त न झाल्यास भाजपाचे कार्यकर्ते ही गुरे पकडून नगर परिषदेत आणून सोडण्याचा इशारा भैय्या मलुष्टे यांनी दिला आहे.