सातारा शहर पोलीसांची कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
दोन वर्षांपासून मोक्का कायद्याअंतर्गत फरार असलेला आरोपीस सातारा शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. सनी लक्ष्मण अडसूळ (रा. प्रतापसिंहनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
धनगरवाडी (ता. सातारा) येथे दि. 16 फेब्रुवारी 2019 रोजी खून करण्यासाठी अपहरण करून हाफमर्डरचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. या गुह्यातील आरोपी सनी लक्ष्मण अडसूळ हा गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता. आरोपी सनी व त्याचे साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. आरोपी सनी हा गेले दोन वर्षापासून फरार असल्याने त्याला पकडण्यासाठी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम व पथकाने सातारा शहर व पुणे अशा ठिकाणी वेळोवेळी शोधमोहीम राबवली. आरोपी सनी राहत असलेल्या ठिकाणाची ठोस माहिती मिळताच शहर पोलिसांनी दि. 14 डिसेंबर रोजी पुणे जिह्यातील कोंडवा या ठिकाणाहून त्याचा पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. मोक्क्याची कारवाई कुख्यात गुंड अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव (रा. प्रतापसिंहनगर) या टोळीप्रमुख व त्यांचे साथीदारांवर करण्यात आलेली आहे. या कारवाईत पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, ज्योतीराम पवार, अभय साबळे, पोलीस कॉन्टेबल संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.