प्रदेश भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती- माजी आयएएस अधिकारी आहेत शर्मा
वृत्तसंस्था / लखनौ
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी अणि माजी आयएएस अधिकारी ए.के. शर्मा यांना उत्तरप्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. शर्मा काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये सामील झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून शर्मा यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याची यापूर्वी चर्चा होती. योगींनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची अलिकडेच भेट घेतली होती.
शर्मा यांच्यासह आणखीन काही नेत्यांनाही पक्षात नवी जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग यांनी पक्षाच्या विविध शाखांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. प्रांशुदत्त द्विवेदी यांना युवा मोर्चा, खासदार गीताशाक्य यांना महिला मोर्चा, कामेश्वर सिंग यांना किसान मोर्चा तर नरेंद्र कश्यप यांना मागास वर्ग मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
गुजरात कॅडरचे 1988 च्या तुकडीचे आयएएस राहिलेले अरविंद कुमार शर्मा यांनी जानेवारी महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. शर्मा हे पंतप्रधान मोदींच्या घनिष्ठ सहकाऱयांपैकी एक आहेत. भाजपने त्यांना उत्तरप्रदेश विधान परिषदेवर पाठविले आहे.
मूळचे मऊचे रहिवासी असलेले शर्मा हे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2001 ते 2013 दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होते. पंतप्रधान झाल्यावर मोदींनी त्यांना पंतप्रधान कार्यालयात जबाबदारी दिली होती. 2014 शर्मा हे पीएमओत संयुक्त सचिवपदावर होते, त्यानंतर बढती मिळवून ते सचिव झाले होते.