अज्ञाताच्या कृत्यानंतर मनपाने सर्व बॅनर्स हटविले
प्रतिनिधी /पणजी
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात तसेच सत्ताधारी पक्षातील महापौर रोहित मोन्सेरात व त्यांच्या समर्थकांचे दिवाळी शुभेच्छा देणारे बॅनर्स व पोस्टर्स मोफत लावण्यात आले तर विरोधी सदस्यांकडून पैसे घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. तथापि चौकाचौकात मोन्सेरात यांचा मोठा फोटो असलेल्या शुभ दीपावली बॅनर्सवरील मोन्सेरात यांचा फोटो कोणीतरी टराटर फाडल्यानंतर खजिल झालेल्या महापालिकेने पटापट बॅनर्स उचलून नेले.
पणजीत भाजप कार्यकर्त्यांचा आमदार बाबूश मोन्सेरात यांना प्रचंड विरोध होत असून मोन्सेरात यांचा चेहरा असलेला बॅनर्स फाडण्याचे कृत्यही त्यातूनच झाले असावे, असा अंदाज राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. चर्च चौकातील 18 जून रस्त्यावरील एका छोटय़ाशा वाहतूक बेटावर एका बाजूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य दोन नेत्यांचे फोटो असलेला होर्डिंग्स मधील कोणीतरी केवळ मुख्यमंत्र्यांचा फोटो कापला होता. त्याच्या पाठिमागे उत्पल पर्रीकर यांचाही दीपावली हार्दिक शुभेच्छा हा एका मोठा होर्डिंग्स होता. या होर्डिंग्सची धास्ती पणजी महापालिकेच्या सत्ताधारी गटाने घेतली आणि उत्पल पर्रीकर यांचे पणजीतील जवळपास सर्वच बॅनर्स एका रात्रीत उचलण्यात आले.
मनपाकडे पैसे न भरताच लावले बॅनर्स
माजी महापौर उदय मडकईकर हे पणजीतून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार असल्याने व ते मोन्सेरात यांचे राजकीय शत्रू बनल्यामुळे त्यांचेही होर्डिंग्स हटविण्यात आले. लागलीच त्यांनी महापालिकेत धाव घेऊन चौकशी केली असता बाबूश मोन्सेरात तसेच महापौरांसह इतर नगरसेवकांनी महापालिकेला पैसेच भरलेले नव्हते. व त्यांचे होर्डिंग्स ठेवण्यात आले व मडकईकर यांनी पैसे भरलेले होते. त्यांनी जोरदार आक्षेप घेताच त्यांचे काही होर्डिंग्स ठेवण्यात आले. मात्र आमदार मोन्सेरात यांनी केवळ पाच दिवसांचे पैसे भरले. मडकईकर यांनी आवाज उठविताच आणखी पाच दिवसांचे पैसे मोन्सेरात यांच्याकडून महापालिकेने घेतल्याचे वृत्त आहे.
मात्र सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी कोणतेही पैसे न भरताच आपली फुकटची प्रसिद्धी मिळविली. बाबूश मोन्सेरात यांचा सुमारे 15 फूट लांबीचा भला मोठा होर्डिंग्स पणजीच्या चर्च चौकात लावण्यात आला होता. त्यावर सर्वांचाच डोळा होता. इतरांचे होर्डिंग्स हटविणाऱया मनपाने मोन्सेरात यांचे होर्डिंग्स सर्वत्र लावण्यास कोणत्या आधारे परवानगी दिली ? मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना हे सहन झाले नाही. रविवारी रात्री अज्ञातांनी चर्च चौकातील मोन्सेरात यांच्या होर्डिंग्स मधला मोन्सेरात यांचा फोटो कराकर कापून टाकला. पणजीत याबाबतची माहिती सर्वत्र पसरली आणि महापौरांनी मनपाची गाडी पाठवून बाबूश यांचे काही होर्डिंग्स उचलले, तशी नामुष्की त्यांच्यावर आली. बॅनर्स होर्डिंग्स लावून आपली प्रतिष्ठा वाढविण्याच्या प्रयत्नात नेत्यांनी आपली प्रतिष्ठा मात्र निश्चित गमावली.