देशभरातील तमाम क्रिकेटप्रेमींसाठी हॉटस्टारची घोषणा
वृत्तसंस्था/ मुंबई
यंदाची आयपीएल स्पर्धा मोफत दाखवल्यामुळे जिओसिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यापाठोपाठ आता डिस्नी + हॉटस्टार प्लॅटफॉर्मने देखील आशिया चषक आणि आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचे मोबाइलवर मोफत स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार कंपनीने हा निर्णय जिओ सिनेमाच्या पावलांवर पाऊल टाकत घेतला आहे. कंपनीला या मोफत स्ट्रीमिंगमुळे अधिकाधिक क्रिकेटप्रेमींना आपल्याकडे आकर्षित करायचे आहे.
हॉटस्टार भारतात वेगाने विकसित होत असलेल्या ओटीटी व्यवसायामध्ये आघाडीवर राहिले आहे. तसेच दर्शकांना चांगला अनुभव मिळावा म्हणून आम्ही अनेक नवीन कल्पना सुरू केल्या आहेत. त्या विविध नवकल्पनांमुळे आम्हाला आमच्या दर्शकांना खुश करता आले आहे. आशिया कप आणि वनडे विश्वचषक स्पर्धा मोबाइल वापरकर्त्यांना मोफत उपलब्ध करून दिल्याचा आम्हाला आनंद आहे, असे भारतातील हॉटस्टारचे प्रमुख शिवनंदन म्हणाले. दरम्यान, जिओसिनेमावर आयपीएल संपल्यानंतर आणि हॉटस्टारवर वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपची फायनल सुरू झाल्यानंतर दर्शक या प्लॅटफॉर्मकडे पुन्हा वळले आहेत.