रामेश्वरतीर्थ तलावावर दिव्यांची व्यवस्था नसल्याने अंधार
प्रतिनिधी /बेळगाव
परंपरेनुसार गौरी विसर्जनासोबत घरगुती गणेश विसर्जन सहाव्या दिवशीदेखील केले जाते. त्यामुळे सोमवारी विसर्जन तलावांवर घरगुती श्रीमूर्ती विसर्जनासाठी गर्दी झाली होती. मात्र, रामेश्वरतीर्थ परिसरात या दिवशीही दिव्यांची व्यवस्था करण्यात आली नसल्याने भाविकांना अंधारातच गणरायांना निरोप द्यावा लागला.
दीड दिवसांच्या आणि पाचव्या दिवशीही विसर्जन करण्यात आले. मात्र, या वेळीही महापालिकेने रामेश्वरतीर्थ परिसरात दिव्यांची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱयांविरोधात संताप व्यक्त करून अधिकाऱयांना काम करण्याची बुद्धी देवो, अशी प्रार्थना गणपती बाप्पांच्या विसर्जनावेळी करण्यात आली. यावेळी मोबाईल प्रकाशात विसर्जन करण्यात आले.
गौरी विसर्जनावेळी घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते. सोमवारी शहर परिसरात सहाव्या दिवशी गणपती विसर्जनासाठी विविध तलावांवर गर्दी झाली होती. कपिलेश्वर तलाव, रामेश्वरतीर्थ, जुने बेळगाव, कणबर्गी, किल्ला तलाव अशा विविध ठिकाणी श्रीमूर्ती विसर्जन करण्यात आले.