पर्यटन खात्याकडून कुटीरे उध्वस्त, लाकडी पलंग, सामान जप्त
प्रतिनिधी /मोरजी
पूर्वी पर्यटन हंगामाला ऑक्टोबर महिन्यात प्रारंभ व्हायचा मात्र आता वर्षभर कमी अधिक प्रमाणात चालतो. राज्यात हल्ली 365 दिवस पर्यटक येत असून या पर्यटकांची सोय करण्यासाठी स्थानिक आणि बाहेरील व्यावसायिक किनाऱयावर लाकडी पलंग, कुटीरे रेस्टॉरंट उभारुन व्यवसाय करतात. पर्यटन खात्याने शुक्रवारी अचानक मोरजी किनाऱयावर धडक देऊन किनाऱयावरील कुटीरे उध्वस्त करून बेकायदा ठेवलेले लाकडी पलंग ताब्यात घेतले. त्यामुळे वयावसायिक धास्तावले आहेत.
पर्यटन खात्याचे उपसंचालक गजानन महाले यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलदास वाडा मोरजी किनारी भागात शुक्रवारी ही कारवाई केली. कारवाईत तीन कुटीरे उध्वस्त केली. व्यावसायिकांनी किनाऱयावर थाटलेले शेकडो लाकडी पलंग जप्त केले. पर्यटन खत्याने अचानक केलेल्या कारवाईमुळे पर्यटकही भयभीत झाले होते. कारवाई करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस फौजफाटा तैनात केला होता.
मोरजी किनाऱयावर बेकायदा लाकडी पलंग घातल्याची तक्रार स्थानिकांनी पर्यटन खात्याकडे केली होती. त्यानुसार पर्यटन खात्याच्या अधिकाऱयाने गुरूवार दि. 22 रोजी या भागाची पाहणी करून बेकायदा घातलेले लाकडी पलंग व्यावसायिकांना स्वतःहून हटवण्यास सांगितले होते. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र काही व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष केले. दि. 23 रोजी पर्यटन खात्याचे उपसंचालक गजानन महाले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यात अनेक लाकडी पलंग, टेबल, खुर्च्या, मोठय़ा छत्र्या व इतर सामान ताब्यात घेतले.
कारवाई सुरूच राहणारः महाले
किनाऱयावर ही कारवाई अशीच कायमस्वरूपी चालू राहणार आहे. ज्यांनी कोणी अजून लाकडी पलंग घालण्यासाठी परवाने घेतले नाहीत त्यांनी परवाने घ्यावेत आणि कायदेशीर व्यवसाय करावा. बेकायदा व्यवसाय करणाऱयांवर या पुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पर्यटन खात्याचे उपसंचालक गजानन महाले यांनी दिला.