दिल्लीबाहेर न जाण्यासह ट्विट न करण्याची अट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबैर यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दिल्ली सोडणार नाही आणि यापुढे कोणतेही ट्विट करणार नाही, या अटीवर पाच दिवसांचा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला. झुबेरच्या याचिकेवर सुनावणी करतानाच सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना नोटीसही बजावली आहे. 2018 च्या ट्विटद्वारे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी जुबैरला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
मागील आठवडय़ात ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबैर यांना दिल्ली पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक केली होती. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली होती. पुराव्यांच्या आधारावर जुबैर यांना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मोहम्मद जुबैर यांच्याकडून एका विशेष समुदायाच्या विरोधात पोस्ट करण्यात आलेले छायाचित्र तसेच त्यात नमूद शब्द प्रक्षोभक आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे समुदायांदरम्यान द्वेष फैलावण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.