ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील राजावाडी रूग्णालयात बेड रिकामा नसल्याने उपचारासाठी गेलेल्या कोरोनाग्रस्त वृद्धेला संपूर्ण रात्र रुग्णालयाबाहेरील रस्त्यावर जागून काढावी लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित 63 वर्षीय महिला पवईची रहिवाशी आहे. तिच्यासह तिच्या कुटुंबातील इतर तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ती राहत असलेली इमारत पालिकेने सील केली आहे. शनिवारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या वृद्ध महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात बेड रिकामा नसल्याने तिला संपूर्ण रात्र रुग्णालयाबाहेरच्या रस्त्यावर जागून काढावी लागली. अखेर रविवारी दुपारी तिला सेव्हन हिल्स या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालय आणि आरोग्य प्रशासनाच्या कार्यावर स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.