प्रतिनिधी/ म्हसवड
म्हसवड येथील मायणी चौकानजीक असलेल्या मेरीमाता हायस्कूल परिसरात असलेल्या वसाहतीमधील सविता सुखदेव शिंदे यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलुप तोडून चोरटय़ांनी चोरी केली. शिंदे यांनी कपाटात ठेवलेले 77 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 3 लाख 8 हजार रुपयाचे दागिने चोरुन नेहल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सपोनि बाजीराव ढेकळे करत आहेत. दरम्यान, माण खटावचे उपविभाग पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे गतीने फिरवण्याच्या सूचना दिल्या.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात सविता शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार 4 रोजी रात्री 8 वाजता माझे सासर असलेल्या पानवण (ता. माण) येथून फोन आला, सासूबाई फार आजारी आहेत लवकर या असे सांगितल्याने मी माझे पती व मुलगा असे तिघे हि पानवण येथे सासूबाइं&ना भेटण्याकरीता घराला बंगल्याला कुलुप लावून पानवण येथे गेलो. यावेळी सासुबाई जास्त आजारी असल्याने तेथेच थांबलो. दरम्यान, रात्री एकच्या दरम्यान सासूबाईंचे निधन झाल्यामुळे त्यांना तेथेच मुक्काम करावा लागला. बुधवारी सकाळी दि. 5 रोजी सकाळी 7 वाजता शिंदे यांच्या शेजारी रहात असलेल्या जाधव यांनी फोन करुन सौ. शिंदे यांना तुमच्या घराचे दार उघडे असून बहुतेक घरात चोरी झाली असावी असे सांगितले.
सासूबाइं&चा अंत्यविधी आटपुन सौ. शिंदे कुटुंब सकाळी 10 वाजता म्हसवड येथील आपल्या घरी परतले असता त्यांना आपल्या घराचे दार उघडे असल्याचे दिसले. घरात जाऊन पाहिले असता बेडरुममधील प्लायवूडचे कपाट चोरटय़ानी उचकटून सर्व कपडे विसकटून फेकले होते. तसेच कपाटात ठेवलेले डब्यातील 2 लाख 80 हजार रुपये किमतीचे 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन व 7 ग्रॅम वजनाचे 28 हजार रुपये किमतीचे काळ्या मन्यामधील गंठण असे एकूण 3 लाख 8 हजार रुपये किमतीचे 7 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरटय़ांनी चोरुन नेहले असल्याची तक्रार सविता सुखदेव शिंदे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास सपोनि बाजीराव ढेकळे, डीवायएसपी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
चोरींच्या घटनामुळे म्हसवड परिसरात घबराहट
दरम्यान, गेल्या आठ दिवसापासून म्हसवड व परिसरात किरकोळ चोऱयाच्या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे. म्हसवड येथील पीएसआय नागपूर येथे नोकरीला असलेल्या त्यांचे घरही चोरटय़ांनी फोडले होते. माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या सह्याद्री गार्डन ढाब्यावर तांब्याच्या धातूच्या भांडय़ावर डल्ला मारला तर देवापुर परिसरातील दोन म्हैसी चोरुन नेल्याची तक्रार दाखल आहे तर चोरटय़ांनी यापुढे जाऊन चक्क गाढवाची चोरी केली होती. मात्र नागरिकांच्या सावधगिरीमुळे चोरटे गावासह सापडले त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. एका आठवडय़ात चोरटय़ांनी लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. पोलिसांचा नाईट राऊंड नक्की कोठे असतो असा सवाल या वाढत्या चोऱयांनी निर्माण झाला आहे.