मेढा / प्रतिनिधी :
म्हाते ता. जावली पंचक्रोशीतील नागरिकांच्या वाहतूक सुविधेसाठी सावली ते म्हाते दरम्यान जुना पूल होता. मात्र हा पूल जीर्ण झाल्यामुळे दुरुस्तीसाठी तोडण्यात येणार असून या पुलावरची वाहतूक सोमवारपासून (दि.24) बंद होणार आहे.
म्हाते पंचक्रोशीतील म्हाते, वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव इत्यादी गावच्या नागरिकांना दळणवळणासाठी वेण्णा नदीवर एक खूप जुना पूल होता. मात्र तो सध्या जीर्ण झाल्यामुळे प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. या पुलाला काही ठिकाणी तडे गेले आहेत तसेच पुलाचे पिलर देखील कमकुवत झालेले आहेत. त्यामुळे या पुलावरून प्रवास हा धोकादायक बनला होता. या पुलासाठी नाबार्ड मधून 3 कोटी 80 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून या पुलाचे पुनर्बांधणीचे काम सोमवारपासून सुरू होणार आहे. पुलाच्या कामामुळे या पुलावरून सर्व वाहतूक बंद करण्यात येणार असून मेढा मोहाट या पर्यायी मार्गाचा वापर या भागातील लोकांना प्रवासासाठी करावा लागणार आहे.