81 वर्षीय रुग्णाला गोव्यातील पहिला डोस : पहिल्या पाच दिवसांत घेणे आवश्यक,आरोग्य मंत्र्यांकडून डॉ. आर्सेकर यांचे अभिनंदन
प्रतिनिधी / म्हापसा
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पुढाकाराने कोरोनावर मात करण्यासाठी खास लस उपलब्ध करण्यात आली असून कोरोना रुग्णांसाठी ही लस ब्रह्मास्त्र ठरली आहे. म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळाचे मेडिसीन प्रमुख डॉ. स्वप्निल आर्सेकर यांच्या नेतृत्वाखालील या लसीचा प्रयोग कोरोनावर उपचार घेणाऱया 81 वर्षीय व्यक्तिवर केला आहे. कसिरीबिंब व लेंबदेवीम ऍन्टिबॉडी कॉकटेल असे या लसीचे नाव आहे. विशेष म्हणजे ही लस घेतल्यास कोरोना झालेला रुग्ण दगावण्याची भीती अजिबात नाही.
कोरोनाच्या तिसऱया लाटेसाठी ही लस रुग्णांना ब्रह्मस्र ठरणार आहे. सध्या जो वयस्क रग्ण आझिलोत उपचार घेत आहे, त्याला अतिदाब, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर असून अशा रुग्णावर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. या लसीची किंमत रु. 60 हजार आहे.
तीन दिवसांत घरी जाऊ शकतो रुग्ण
या रुग्णाचे नातेवाईक म्हणाले की, कोविड झाल्यावर पहिल्या पाच दिवसांच्या आत ही लस घ्यायला पाहिजे. जेणे करून रुग्ण पूर्णतः बरा होऊ शकतो. एरव्ही इस्पितळात कोविडमुळे दाखल केल्यास खर्च लाखभराच्या घरात जातोच. त्यापेक्षा ही लस घेऊन रुग्ण अवघ्या तीन दिवसांत घरी जाऊ शकतो. राज्यातील पहिला प्रयोग आमच्या कुटुंबातील 81 वर्षीय इसमावर करण्यात आला आहे. याबद्दल आरोग्यमंत्री, डॉ. स्वप्निल आर्सेकर यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे, असे ते म्हणाले.आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून डॉ स्वप्निल आर्सेकर व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.