आमदारांना बाजारपेठेत पाहणी करण्याची मागणी
प्रतिनिधी / म्हापसा
अखिल गोवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर यांच्या नेतृत्वाखाली म्हापशातील व्यापारी वर्गांनी म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्यासमवेत नगरसेवकांची भेट घेऊन म्हापशात भेडसावण्यात येणाऱया समस्यांचा पाढा वाचला. सध्या कोविडच्या काळात लॉकडाऊन आणि त्यानंतर झालेले नुकसान यामुळे व्यापारी वर्गांना बऱयाच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे दुकानावर कोणी येत नसल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे त्यामुळे आम्हाला नगरपालिका मंडळाकडून दुकानातील मालाची पूर्वीप्रमाणे विक्री करण्यास द्यावी. अशी मागणी अखिल गोवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर यांनी नगराध्यक्ष व आमदारांकडे केली. आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा बाजारपेठेत येऊन व्यापाऱयांसमवेत फिरून समस्या जाणून घ्याव्या अशी मागणीही यावेळी व्यापारी मंडळांनी केली.
यावेळी म्हापसा पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर उपस्थित होते. व्यापाऱयांनी एक निवेदनही नगराध्यक्षांना देऊन व्यापाऱयांच्या समस्या त्वरित सोडवाव्या अशी मागणी केली. सध्याच्या कोविड स्थितीत परप्रांतीय व्यापाऱयांकडून म्हापसा बाजारपेठेत सामाजिक अंतराचा फज्जा उडविला जात असल्याने अशा व्यापाऱयांविरोधात नगरपालिका प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे सद्यास्थितीत करमाफी करण्याचीही मागणी व्यापारी संघटनेकडून यावेळी करण्यात आली. बाजारपेठेत प्रवेश करणाऱया ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरलेली बेरिकेड्स तसेच ‘पे पार्किंग फी’ आकारणी तात्काळ बंद करण्याची मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली. सध्या ‘पार्किंग फी’ ची निविदा घेतलेले इसम बाऊंसर आणून बाजारपेठेत दादागिरी व धमकीची भाषा करीत आहेत असा आरोप व्यापाऱयांनी केला. त्यांचे कंत्राक्ट रद्द करावे अशी मागणीही व्यापाऱयांनी केली. त्यांच्याविषयी अनेक तक्रारी आपल्याकडे व पालिका मुख्याधिकाऱयाकडे आल्याची माहितीही यावेळी नगराध्यक्षांनी व्यापाऱयांना दिली.
आपली पोळी भाजून घेण्यासाठीच आटापीटा– आशिष शिरोडकर
सध्या म्हापसा बाजारपेठेतील सर्व व्यापारी नुकसानग्रस्तीत व्यवसाय करीत आहेत. काहीजण गेटीमुळे धंदा होत नाही असा तर्क वितर्क लावीत आहेत. काहीजण विक्रेते येत नसल्याने धंदा होत नाही असे म्हणत असले तरी व्यवसाय पूर्वीपासूनच ठप्प झालेला आहे. याबाबत व्यापारी संघटनेला पालिकेत जाणार म्हणून कोणी सांगितले नव्हते. आणि गेले तरी पालिकेची दारे सर्वांसाठी खुली आहेत. तेथे जाऊन आपल्या समस्या सांगणे यात काही गैर नाही. व्यापारी संघटनेचे दोघे सदस्यही तेथे उपस्थित होते. त्याचाही बाजारपेठेत धंदा आहे. व्यापारी संघटना पूर्व बैठक घेतात ठरवितात नंतरच पालिकेकडे जातात. त्यामुळे मी तेथे जाऊन थेट काही बोलू शकत नाही. खजिनदाराच्या वडीलांचे निधन काही व्यापारी बंधु कोरोन्टाईन आहेत त्यामुळे बैठकही झालेली नाही. आम्ही तेथे जाण्याचे यापूर्वीच ठरविले होते. येथे काहीतरी राजकीय वास येत असून येत्या काही दिवसात नगरसेवक जाणार आहेत. त्यापूर्वी तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमची सर्व कामे करून देऊ असे काहीजणांनी व्यापाऱयांना सुचितही केले आहे असे आपल्यास सागंण्यात आले.
व्यापारी संघटना म्हणजेच सर्व व्यापारी. त्यांनी व्यापारी कमिटीला सांगितले नाही असा आरोप यावेळी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी दै. ‘तरुण भारत’ ला बोलताना सांगितले. कमिटीला सांगितले नाही म्हणून आमचा काही दोष नाही. कारण तेथे जाण्याचा सर्वांना अधिकार आहे. काही नगरसेवकांना आपल्या मर्जीतून शकुंतलेजवळ विक्रेत्यांना बसविण्याची इच्छा असून त्यांनी व्यापाऱयावर दबाव घालून पालिकेत बोलावून घेतले आहे. आता पालिकेत नगरसेवकांना एक महिना असून जाण्यापूर्वी आपली पोळी भाजून घ्यावी व आपण व्यापाऱयांकडून काहीतरी केले असे दाखविण्यासाठीच हा आटापीटा असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. शेवटी आम्हाला जगायला पाहिजे. कोरोना घेऊन बसू नये. असेच नगराध्यक्ष म्हणून लागले तर मग काही उपाय नाही. असे शिरोडकर म्हणाले.
दोन दिवसात आमदार बाजारपेठेची पाहणी करणार
दरम्यान अखिल गोवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर व उपस्थित व्यापारी बंधुंनी यावेळी उपस्थित असलेले म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांना म्हापसा बाजारपेठेत येऊन व्यापारी वर्गाची समस्या जाणून घ्यावी अशी मागणी केली असता पत्रकारांनी म्हापसा बाजारपेठेत आपण कधी भेट देणार असा प्रश्न केला असता येत्या दोन दिवसात आपण म्हापसा बाजारपेठेला भेट देऊन व्यापाऱयांच्या समस्या जाणून घेणार असल्याची माहिती आमदारांनी दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष मर्लीन डिसोझा, नगरसेवक संदीप फळारी, सुशांत हरमलकर, तुषार टोपले, फ्रँकी कार्व्हालो, स्वप्नील शिरोडकर उपस्थित होते.
मुख्याधिकारीनी बाजार पेठेकडे लक्ष द्यावे
मध्यतरीच्या काळात एकदम गायब किंबहुना अखिल गोवा व्यापारी संघटना अस्तित्वात आहे कां नाही असा प्रश्न सर्वांना पडलेला होता पण आज अचानक माजी म्हापसा व्यापारी संघटना अध्यक्ष
श्री. नारायण कारेकर व ईतर मोजकेच व्यापारी बंधु आपल्या समस्या घेऊन नगराध्यक्ष रायन ब्रागांझा व आमदार जोशुआ डिसौझा ह्यांना भेटले व समस्या त्यांनी मांडल्या .
- एक गोष्ट अचंबित करुन गेली ति म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या संघटनेचे दोन पदाधिकारी श्रीपाद येंडे व राजेंद्र पेडणेकर ह्या शिष्टमंडळात होते त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की सध्याच्या संघटनेत फुट पडली आहे कां ?
- एकंदरीत माहिती मिळाली त्यावरुन हे दोघे समितीला न कळवताच ह्या शिष्टमंडळात हजर होते .
- म्हापसा बाजारपेठ म्हणजे पुर्विपासुनच समस्यांचे आगर हे सर्वश्रुत आहेत त्यातल्या त्यात सध्या कोरोना महामारी निमित्ताने अवकळा आलेली आहे व सर्वचजण आर्थिक विवंचनेत सापडले असल्याने गडबडून गेले आहेत.
- ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी कायद्यानुसार टाऊन वेंडींग कमिटीची पुनर्स्थापना दोन वर्षे अगोदर जोरदार मागणीनुसार करण्यात आलेली आहे व त्यानंतर ह्या कमिटीच्या केवळ नावालाच मागिल मुख्याधिकारी क्लेन मदेरा ह्यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका घेतल्या आहेत .
नविन मुख्याधिकारी कबिर शिरगावकर ह्यांनी ह्या समितीतील मागिल आढावा घेऊन व सध्या ते स्वतः अध्यक्ष ठरत आहे हे लक्षात घेऊन समस्यांवर मात करण्यासाठी उपाययोजना करावी अशी विनंती म्हापसा पिपल्स युनियनचे उपाध्यक्ष श्री . सुदेश तिवरेकर ह्यांनी केले आहे .