वार्ताहर / म्हापसा
राष्ट्रवादी पक्षातर्फे महागाई विरोधात म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करून उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. भाजपने पेट्रोल तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास दिला असल्याने यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. भाजपने लोकांची फसवणूक केली आहे. आता नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने म्हापसा वासियांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्री तसेच म्हापसाच्या आमदारांनी बसस्थानकाची पायाभरणी केली आहे. तसे पाहिले तर मागील कित्येक वर्षात म्हापसाचा विकास झालेला नाही. म्हापसा जुन्या बसस्थानकाची दुर्दशा, रस्ते खराब आहे. म्हापसामध्ये आता भाजप पक्ष पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सक्षम आहे असे राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी सांगितले. भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारीही वाढली आहे. शिक्षित युवकांना नोकऱया मिळत नाही. सिलींडर वाढला आहे, आवश्यक वस्तूंच्या किमती गगनाला पोहोचल्या आहे. भाजपच्या महिला मोर्चाने आता रस्त्यावर येऊन याचा निषेध करणे गरजेचे आहे असे संजय बर्डे म्हणाले.