वार्ताहर / म्हापसा
म्हापसा येथील नवीन बसस्थानकाची पायाभरणी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोजा, म्हापसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक, सर्व मार्केट समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
म्हापसा हे राज्यातील आर्थिक गुंतवणुकीचे मोठे शहर असून सर्वात मोठी बाजारपेठ या शहरात भरते. म्हापसा वासियांना तसेच म्हापसा शहरातील दुकानदारांना योग्य बसस्थानक नसल्याने अडचण भासत होती. या लोकांचे आता स्वप्न पूर्ण होणार असून 3.50 कोटी रुपये खर्चून गोवा साधनसुविधा विकास महामंडळांतर्गत सहा महिन्याच्या आत हे बसस्थानक तयार होणार आहे. यामुळे म्हापसा शहरातील बसचालक, रीक्षा चालक, टेम्पो चालक सर्वांना याचा फायदा होणार आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
या बसस्थानकाचा फायदा म्हापसा शहरात काम करणाऱया सर्वसामान्य जनतेला होणार आहे. या बसस्थानकामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा असणार आहे. हा बसस्थानक पूर्ण झाल्यावर लवकरच शहरातील मुख्य व मोठा बसस्थानक बांधला जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली.
नगरपालिका क्षेत्रातही आत्मनिर्भर योजना राबविणार
आत्मनिर्भर भारत या योजनेला ग्रामपंचायत पातळीवर चांगला प्रतिसाद लाभत आहे. आता नगरपालिका क्षेत्रात शहरामध्ये या योजनेला सुरुवात केली जाणार असून शहरात राहणारे लहान लहान व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे. भाजप सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत असून सर्वांपर्यंत चांगल्या योजना, सविधा मिळाव्या यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
म्हापसाच्या विकासात भर- आमदार जोशुआ
म्हापसा शहराला हवा असलेल्या बसस्थानकाची मागणी शेवटी पूर्ण झाली आहे. म्हापसाच्या लोकांना रवींद्र भवनही लवकर मिळणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली म्हापसा शहराचा विकास होत असून सरकारचा चांगला पाठिंबा मिळत आहे. माझ्या वडिलांची म्हापसा शहरासाठी असलेली स्वप्ने पूर्ण करणार आहे. असे आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले.
3.50 कोटीचा बसस्थानक
या बसस्थानकाचा एकूण खर्च 3.50 कोटी असून सहा महिन्यात हा बसस्थानक पूर्ण होणार आहे. यात कदंबाचे कार्यालय, चालकांसाठी खोली, पॅन्टीन, शौचालय, टेम्पो पार्किंग, बस, चारचाकी, रीक्षा, दुचाकी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बसस्थानक ते मार्केटमध्ये जाण्यासाठी एक शॉर्टकट रस्ता बांधला जाणार आहे असे आमदार जोशुआ यांनी सांगितले.