वार्ताहर / म्हापसा
म्हापसा शहर हे जलदगतीने वाढणारे शहर असल्याने या शहराला सांडपाणी निचरा प्रकल्प गरजेचा आहे. सरकारने लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांनी सांगितले. म्हापसा येथील देव बोडगेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
म्हापसा शहरात निचरा प्रकल्प होत नाही तोपर्यंत तार नदीचे प्रदुषण कमी होणार नाही. जायका कंपनीचा सांडपाणी निचरा प्रकल्प लाभदायी ठरणार होता पण तत्कालीन म्हापसा नगरपालिकेच्या सदस्यांनी याला विरोध केल्याने हा प्रकल्प झाला नाही. असे ढवळीकर म्हणाले.
नवीन बसस्थानकाची गरज
आपण 2008 मध्ये म्हापसा शहराला नवीन बसस्थानक बांधण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार गांधीचौक येथे 20 हजार चौरस मीटर जागा भूसंपादन केली होती. पण मध्यंतरी हा बसस्थानक पीपीपी मॉडेलवर बांधण्याचा प्रयत्न झाला व मी व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी याला विरोध केला. अन्यथा ही जागा बिल्डर लॉबीच्या घशात गेली असती. येत्या विधानसभेत या बसस्थानकासाठी मागणी करणार आहे.
म्हापसा शहरासाठी 25 एमएलडी पाण्याची गरज
सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करत असताना म्हापसा शहरासाठी अस्नोडा पाणी प्रकल्पातून दोन पाईपलाईन घालून घेतल्या होत्या पण याचा फायदा म्हापसाला न होता शिवोली, थिवी, कळंगूट भागाला जास्त झाला. म्हापसा शहराला दररोज 25 एमएलडी पाण्याची गरज आहेय पर्वरी येथे नवीन जलकुंभ बांधून तयार आहे तर गिरी येथील नियोजित जलकुंभ बांधण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. तेव्हाच म्हापसा शहराचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे ढवळीकर म्हणाले.
भाजपा व कॉग्रेसने म्हादईचा सौदा केला
भाजप व काँग्रेस पक्षाने म्हादईचा सौदा केला आहे. भाजप केंद्राच्या तालावर नाचत आहे. प्रादेशिक पक्षच दोव्याचे हित सांभाळू शकतात. येणाऱया काळात संपूर्ण उत्तर गोव्यात पाण्याचा मोठा फटका बसणार आहे. पण या भाजप सरकारला याचे काहीच पडलेले नाही.
पालिका निवडणुका पक्ष पातळीवर घ्यावा
सरकारने 11 पालिका व 1 महानगरपालिका मंडळाच्या निवडणुका पक्षपातळीवर घेण्याची गरज आहे. मगो पक्ष सत्तेवर असताना पालिका निवडणुका पक्षपातळीवर घेतल्या होत्या. मगो पक्ष आपल्या संघटनेच्या जोरावर सर्व पालिका निवडणुका लढविणार आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष 21 आमदार निवडून येण्यावर भर देणार असल्याचे आमदार सुदीन ढवळीकर म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, मगो नेते भारत तोरस्कर, विनोद फडके, महेश साटेलकर, एकनाथ म्हापसेकर व इतर सहकारी उपस्थित होते.