म्हैसूर/प्रतिनिधी
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ८५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यामध्ये लावलेल्या वाहनामुळे वेळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एका कार चालकाला शनिवारी म्हैसूरमध्ये ११ ह्जाररुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
म्हैसूरचे सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) एस.एन. संदेश कुमार यांनी वाहन चालक जयंत, रहिवासी हसन यांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता न दिल्याबद्दल ११हजार रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती दिली. मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम, २०१९ च्या तरतुदीनुसार त्याला दंड ठोठावण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
२२ ऑगस्ट रोजी चिकमंगळूर येथे राहणाऱ्या ८५ वर्षीय चंद्रशेकर आचार्य यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि एका रुग्णवाहिकेतून ते म्हैसूरच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात जात होते. किशोर चिकमंगळूर सोडून रात्री साडेआठच्या सुमारास म्हैसूरमधील हंसूर रोडवरील बेलावाडी जंक्शनला पोहोचले असता जयंत या कारचालकाने रस्त्याच्या मध्ये कार लावल्याने रुग्णवाहिकेला मार्ग मिळाला नाही.
रुग्णवाहिकेचा सायरन वाजत होता आणि किशोरने वारंवार हॉर्न करूनही जयंतने गाडी हलविण्यास नकार दिला. थोड्यावेळाने चालक किशोर रुग्णवाहिकेतून बाहेर पडून जयंतला जाण्यासाठी विनंती करत होता पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला विनवणी केल्यावरही जयंतने गाडी हलविण्यास नकार दिला. हा युक्तिवाद १५ मिनिटे चालला आणि रूग्णवाहिका रुग्णालयात पोहोचताच आचार्य यांना रुग्णालयात दाखल करताच मृत घोषित केले गेले. डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले की कदाचित त्यांना रुग्णालयात लवकर आणले असते तर त्यांचा जीव वाचला असता.