प्रतिनिधी / येळ्ळूर :
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष, नवहिंद क्रीडा केंद्राचे संस्थापक, नवहिंद सोसायटीचे संस्थापक, सहकारमहषी वाय. बी. चौगुले यांचे वयाच्या 83 व्या वषी दीर्घकालीन आजाराने मंगळवारी सकाळी 10 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बेळगावच्या विविध सहकारी पतसंस्था, शिक्षणसंस्था याचबरोबर म. ए. समितीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढय़ामध्ये नेहमीच भाग घेतला. येळ्ळूरमध्ये नवहिंद क्रीडा केंद्राची स्थापना केली. त्यानंतर सर्व युवकांना एकत्र करून पतसंस्था स्थापन केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. या पतसंस्थेला नावारुपाला आणण्यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. युवकांना आणि कार्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शन केले आहे.
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी प्रयत्न केले. समितीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये भाग घेतला. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे कार्य केले आहे. पेशाने शिक्षक असल्यामुळे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजता शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, समितीचे सरचिटणीस मनोज पावशे, वाय. एन. मजुकर, रघुनाथ बांडगी, प्रदीप मुरकुटे, दत्ता उघाडे, आप्पा जाधव, एल. आय. पाटील, रामभाऊ कुट्रे, नवहिंद पतसंस्थेचे पदाधिकारी, याचबरोबर इतर पतसंस्थांचे चेअरमन, संचालक तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. वाय. बी. चौगुले यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.