मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली यावषीही काळय़ा दिनानिमित्त भव्य सायकल फेरी काढली जाणार होती. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला जाणार आहे. परंतु हा कार्यक्रम देखील करू नये, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली. परंतु म. ए. समिती धरणे आंदोलनावर ठाम असून केंद्र सरकारचा निषेध करणारच, असा पवित्रा म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांनी शनिवारी घेतला.
पोलिसांनी सायकल फेरीला परवानगी नाकारल्यामुळे 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय म. ए. समितीने घेतला. सध्या राज्यात दुखवटा असून हे आंदोलन करू नये, असे पोलिसांनी पदाधिकाऱयांना सांगितले. मागील 65 वर्षांपासून होणाऱया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन करण्याच्या भूमिकेवर पदाधिकारी ठाम राहिले. मार्केट पोलीस स्टेशन येथे ही बैठक पार पडली.
या बैठकीला पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह इतर उपस्थित होते.