ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्व सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांना दिल्यानंतर प्रत्येकाने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेतले आहेत.
लालबागचा राजा गणेश मंडळानंतर आता गिरणगावातल्या चिंचपोकळीचा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या चिंतामणीची देखील प्राणप्रतिष्ठापणा यंदा मंडळाच्या देव्हाऱ्यातील पारंपारिक चांदीच्या गणेशमूर्तीने करण्यात येणार आहे. यावर्षी दरवर्षीप्रमाणे मूर्ती घडवण्यात येणार नाही. चांदीच्या मूर्तीची पूजा करून गणेशोत्सवाची परंपरा अखंडित राखण्यात येईल, असा निर्णय मंडळाने घेतला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने प्रसिद्ध असलेला चिंतामणीचा आगमन सोहळा,पाटपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याचे आधीच जाहीर केलेले आहे. मूर्तीच्या उंचीबाबत शासन निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घेण्याचे मंडळाने आधीच जाहीर केलेले होते.
मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक म्हणाले, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गतवर्षी शतक महोत्सव जल्लोषात, आनंदात व भक्तिभावाने साजरा केला. यंदाचे मंडळाचे 101 वे वर्ष असून मंडळाने गत 100 वर्षात सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेच काम करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. मात्र, यंदा मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देेत मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा खंडित होऊ न देता मंडळात पुजल्या जाणार्या पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर मंडळाकडून हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून जाहीर करत, गणेशोत्सव काळात रक्तदान शिबीर,आरोग्य चिकित्सा, रुग्णसाहित्य केंद, शासकीय रुग्णालयास वैद्यकीय उपकरण आणि 101 कोविड योद्धयांचा सन्मान आदी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच मंडळ यावर्षी मंडपासमोर कृत्रिम तलाव बांधून तेथे विभागातील घरगुती गणेश मूर्तीना विसर्जनासाठी उपलब्ध करून देणार आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा या वाक्यानुसार मंडळ यावर्षी उत्सव साधेपणाने साजरा करून जनतेचे आरोग्य जपण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.