प्रतिनिधी/ बेंगळूर
विश्वविख्यात म्हैसूर दसरोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना परिस्थितीत रुग्णांवर उपचार करून संसर्गाच्या नियंत्रणासाठी परिश्रम घेतलेल्या कोरोना योद्धय़ांना दसरा उत्सवाच्या उद्घाटनाचा मान देण्याची घोषण सरकारने केली होती. त्यानुसार दसरा उत्सव तांत्रिक समितीने शनिवारी बेंगळूरच्या जयदेव इस्पितळाचे संचालक डॉ. मंजुनाथ यांची उद्घाटक म्हणून निवड केली आहे.
दसरा उत्सव प्रारंभ होण्यास सहा दिवस शिल्लक आहेत. मागील वर्षी साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांना हा मान मिळाला होता. कोरोना परिस्थितीमुळे जम्बो सवारीवेळी 300 लोकांना का प्रवेश दिला जात आहे, असा प्रश्न भैरप्पा यांनी उपस्थित केला असून केवळ माहुतांच्या उपस्थितीत जम्बो सवारी काढता येईल, असा सल्ला सरकारला दिला आहे.
दरम्यान, म्हैसूरच्या चामुंडी टेकडीवरील चामुंडेश्वरी देवीच्या विशेष पुजनाने दसरोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, डॉ. मंजुनाथ यांच्याबरोबरच पालिका कर्मचारी मरगम्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ. नवीन, परिचारिका रुक्मिणी, आशा कार्यकर्त्या नूर जहाँ, पोलीस कुमार आणि बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे अयुब अहमद यांना दसरोत्सवाच्या उद्घाटनाचा मान देण्यात आला आहे.