प्रमुखांच्या बैठकीत अधिकाऱयांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर यंदा दसरोत्सवात सीमोलंघनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. म्हैसूरचा दसरा साध्यापणाने व औपचारिकपणे साजरा केला जात आहे. त्याच प्रमाणे बेळगावकरांनीही साध्या पध्दतीने दसरा साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले आहे.
गुरुवारी सायंकाळी बेळगाव देवस्थान कमिटी व चव्हाट गल्ली येथील ज्योतिर्लिंग सासनकाठी पदाधिकाऱयांसह पोलीस अधिकाऱयांची बैठक झाली. खासगी हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा आदी अधिकारी उपस्थित होते.
यंदा सीमोलंघनाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शहरात पालखी मिरवणुकीला परवानगी असणार नाही. गल्लीतील मंदिरांभोवती पाच प्रदक्षिणा घालून दसरोत्सव साजरा करावे, असे आवाहन अधिकाऱयांनी केले. यावेळी रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुस्कर, सुनील जाधव, विजय तम्मुचे, लक्ष्मण किल्लेकर, नागेश नाईक, अभिजित आप्टेकर, परशराम माळी, श्रीनाथ पवार आदींसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गल्ली पातळीवर यासंबंधी चर्चा करुन पुढच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.