इंग्लंडचा डाव 188 धावात गुंडाळल्यानंतर कांगारुंचीही खराब सुरुवात, दुसऱया दिवसअखेर 3 बाद
होबार्ट / वृत्तसंस्था
पॅट कमिन्सने 45 धावात 4 बळी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यातील दुसऱया दिवशी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 188 धावांमध्ये गुंडाळला. मात्र, दुसऱया डावात यजमान संघाचीही 3 बाद 37 अशी अवस्था झाली. दुसऱया दिवसअखेर स्टीव्ह स्मिथ 17 तर स्कॉट बोलँड 3 धावांवर नाबाद राहिले. यजमान ऑस्ट्रेलियन संघ या लढतीत आता 152 धावांनी आघाडीवर आहे.
पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी प्राप्त करणाऱया ऑस्ट्रेलियन संघाची दुसऱया डावात खराब सुरुवात होणे धक्कादायक ठरले. डेव्हिड वॉर्नर डावातील तिसऱयाच चेंडूवर पारंपरिक कर्दनकाळ ठरत आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला. वॉर्नरला येथे खातेही उघडता आले नाही. त्यानंतर मार्नस लाबुशाने (5) ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाची 2 बाद 5 अशी स्थिती झाली.
दिवसाच्या उत्तरार्धात मार्क वूडने उस्मान ख्वाजाला (11) बाद करत आणखी एक यश मिळवून दिले. त्यानंतर स्मिथ व बोलँड यांनी आणखी पडझड होणार नाही, याची दक्षता घेतली.
तत्पूर्वी, तिसऱया व शेवटच्या सत्राला 6 बाद 124 धावांवरुन पुढे सुरुवात करताना सॅम बिलिंग्ज व ख्रिस वोक्स यांनी आणखी 28 धावांची भर घातली. कॅमेरुन ग्रीनने बिलिंग्जला (29) डावातील 42 व्या षटकात बाद केले. त्यानंतर वूड व वोक्स यांनी आठव्या गडय़ासाठी 30 धावांची भागीदारी साकारली. स्टार्कने वोक्सला (36) यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेकरवी झेलबाद केले आणि इंग्लंडची 8 बाद 182 अशी स्थिती झाली. त्याच षटकात स्टार्कने स्टुअर्ट ब्रॉडचा (0) त्रिफळा उडवला. मार्क वूड शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद झाल्यानंतर इंग्लंडला सर्वबाद 188 धावांवर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने 4 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद 303. इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 188 (जो रुट 34, सॅम बिलिंग्ज 29, ख्रिस वोक्स 36. पॅट कमिन्स 4-45, स्टार्क 3-53, बोलँड व ग्रीन प्रत्येकी 1 बळी). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः 19 षटकात 3 बाद 37 (ख्वाजा 11, वॉर्नर 0, लाबुशाने 5, स्मिथ नाबाद 17, बोलँड नाबाद 3. ब्रॉड, वोक्स व वूड प्रत्येकी 1 बळी).