वार्ताहर / यड्राव
यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मधील अनेक उद्योजकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राकडून परवानगी घेऊन अनेक उद्योग धंदे सुरू केले आहेत. यामध्ये वस्त्रोद्योग इंजीनियरिंग कृषी व पीव्हीसी पाईप आदी उद्योगांचा समावेश आहे. उद्योग धंद्यांना परवानगी देताना शासनाने सोशल डिस्टिंक्शन तसेच व कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षितते विषयी नियम घातले आले आहेत. परंतु कारखानदारांकडून अशा नियमांना हरताळ फासला जात असल्याची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. अशा कारखानदारांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक आहे.
यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये वस्त्रोद्योग इंजीनियरिंग कृषी व पीव्हीसी पाईप आदी उद्योगांना जिल्हाधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये कामगारांचे सोशल डिस्टिंक्शन राखणे गरजेचे आहे. तसेच कामगारांना मास्क, हॅन्डग्लोज ,सॅनीटायझर, पीपीई कीट देणे बंधनकारक आहे. तसेच कारखानदारांनी कामगारांना कामाच्या ठिकाणी जेवणाची व राहण्याची व्यवस्था करणे ही बंधनकारक आहे. तसेच कामगारांची संख्या ही ठरवून देण्यात आली आहे. असे असतानाही ज्या कारखानदारांना कमाल 30 कामगारांची संख्या ठरवून दिली असतानाही त्या ठिकाणी 60 ते 70 कामगार काम करताना आज दर्शनास येत आहेत. ही खरी वस्तुस्थिती आहे. केवळ दहा बाय बाराच्या खोलीत 10 कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कारखानदारांनी अद्याप पी पी इ किट व आरोग्य विषयक सुविधा कामगारांना देण्यात आली नाहीत. पोलीस प्रशासन सध्या बंदोबस्तात व्यस्त आहे. त्याचाच गैरफायदा घेत अशा कारखानदारांकडून कामगारांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.