ऑनलाईन टीम / यवतमाळ :
सॅनिटायझर प्यायल्याने 7 जणांना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवळमाळच्या वणीमध्ये घडली आहे. लॉकडाऊनमुळे दारुची दुकाने बंद असल्याने, तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्यायले आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वणी शहरातील तेली फैलमधील दत्ता लांजेवार (वय 47 वर्षे) यांनी काल (23 एप्रिल) रात्री नऊ सुमारास सॅनिटायझर प्यायले आणि नंतर घरी आल्यावर रात्री दहा वाजता त्याच्या छातीत त्रास होण्यास सुरुवाल झाली. त्यानंतर असह्य वेदना होत असल्याने त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवां व्यक्तिरिक्त सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तळीरामांना दारु खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच यवतमाळमध्ये दारु न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायलेल्या 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
यातील सहा मृतांची नावे समोर आली आहेत. यामध्येदत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे आणि गणेश शेलार यांचा समावेश आहे. दरम्यान यातील तीन जणांचा घरीच मृत्यू झाला होता. तर इतर 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे समोर येत आहे.