उद्या मुख्यमंत्री येडियुराप्पा मांडणार राज्याचा अर्थसंकल्प
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना संसर्गाचे सावट पुन्हा गडद होत असताना मुख्यमंत्री येडियुराप्पा सोमवार दि. 8 मार्च रोजी राज्याचा 2021-22 या वर्षातील अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पाविषयी राज्यातील जनतेमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले असताना जनतेला आणखी आर्थिक फटका बसू नये या उद्देशाने या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची परवड असणार नाही. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होत असून राज्यातील जनता अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर येडियुराप्पा यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात करवाढीची तरतूद केलेली नाही. यंदा करवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी यावेळी नवे करवाढीचे प्रस्ताव असणार नाहीत.
विधानसभेत सोमवारी दुपारी 12.05 वाजता अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा आठव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्याने जनता हैराण आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलमधील करात राज्यामधून कपात व्हावी अशी जनतेतून मागणी आहे. मात्र अशी शक्यता कमी असल्याचे समजते. जर पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्यास राज्याच्या उत्पन्नात घट होईल. दरम्यान अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच कर कपातीसंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
मागील एप्रिलपासून राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून सरकारने मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पाची व्याप्ती कमी ठेवली आहे. त्यामुळे विविध खात्यांच्या अनुदानातही कपात होण्याची शक्यता अधिक आहे. मागील वर्षी 2.37 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. राज्याची आर्थिक स्थिती पाहता अर्थसंकल्पाची व्याप्ती कमी करणे अनिवार्य आहे.