एअर इंडियाचे विमान रोमानियाहून मुंबईत
मुंबई, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या तिसऱया दिवशी एअर इंडियाचे विमान बुखारेस्ट, रोमानिया येथून मुंबईत परतले. युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान मायदेशी आले आहे. याप्रसंगी घरवापसी केलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत होता. दरम्यान, मुंबईत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात आणि घरापर्यंत सोडण्याची तयारीही सरकारने केली आहे. त्यानुसार आरटी-पीसीआर आणि कोरोना नियमावलीमध्येही संबंधितांना सूट देण्यात आली आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे बहुतांश विद्यार्थी येत्या एक-दोन दिवसातच आपल्या कुटुंबियांना भेटू शकणार आहेत.
युक्रेनमधून भारतात येणाऱया प्रवाशांसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष कॉरिडॉर बनवण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी सायंकाळनंतर हे विमान मुंबईत दाखल झाले. या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी केंद्र सरकारने ही विशेष विमानसेवेची सोय केली होती. तसेच युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना पासपोर्टसह कोविड-19 लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआरचा नकारात्मक अहवाल दाखवण्याची सूचना करण्यात आली होती.
युक्रेनमधील भारतीय दुतावासाने केलेल्या नियोजनानुसार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुतावासाने भारतीयांच्या तपासणीसाठी आणि सोयीसाठी तीन पथके तयार केली होती. तसेच एका सल्लागाराचीही नेमणूक केली होती. या पथकांनी भारतीयांना पश्चिम युक्रेननमधून बाहेर पडण्यास मदत केली. सुरुवातीला अडकलेल्या सर्व भारतीयांना पोलंडला नेण्यात आले. तेथून त्यांना भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. सीमेवर तैनात असलेल्या भारतीय अधिकाऱयांशी समन्वय साधल्याशिवाय सीमेकडे जाऊ नका. समन्वयाशिवाय सीमेवर पोहोचल्याने समस्या निर्माण होऊ शकतात, अशी सूचनाही विद्यार्थ्यांना करण्यात आली होती.
‘भारत माता की जय’चा नारा युपेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोलंड आणि रोमानिया सीमेवरून एअरलिफ्ट करण्यात आले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना घेऊन बस पोलंडला रवाना झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच विमानामधील प्रवासादरम्यानही सर्वांच्या हातात ‘तिरंगा’ असल्याचे दिसत होते. त्याचबरोबर मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांनी भावुक होत माथा जमिनीवर टेकल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.