रशियावर गोळीबाराचा आरोप
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान वृत्तांकन करणाऱया पत्रकारांवरही हल्ले होत आहेत. 3 पत्रकारांवर मंगळवारी हल्ला झाला असून यात 2 जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. रशियाने पत्रकारांवर गोळीबार केल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला आहे.
युक्रेनच्या सैन्यानुसार कीव्हनजीक फॉक्स न्यूजची टीम वृत्तांकन करत होती. यादरम्यान रशियाच्या सैन्याने त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात कॅमेरामन पियरे जक्रेव्स्की आणि निर्माता ऑलेक्जेंड्रा कुर्शीनोव्हा यांचा मृत्यू झाला. तर पत्रकार बेंजामीन हॉल यांच्या एका पायाला मोठी ईजा झाली आहे. यापूर्वी 13 मार्च रोजी देखील एका हल्ल्यात विदेशी पत्रकाराचा मृत्यू झाला होता. इरपिनमध्ये रशियाच्या गोळीबारात विदेशी पत्रकार मारला गेला होता. तर अन्य विदेशी पत्रकार जखमी झाले हेते. या पत्रकारांना उपचारासाठी ओखमतदित रुग्णालयात हलविण्यात आले होते. रशियाचे सैन्य पत्रकार, डॉक्टर, गरोदर महिला, मुले, नागरिकांवर गोळय़ा झाडत असल्याचा आरोप युक्रेनच्या खासदार इन्ना सोवसुन यांनी केला आहे.