रशियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह आण्विक युद्धाभ्यास
वृत्तसंस्था / कीव्ह
युक्रेनसोबत युद्धाच्या शक्यतेदरम्यान रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह आण्विक अभ्यास सुरू केला आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी यासंबंधी आदेश दिला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी सैन्याभ्यासाची पुष्टी दिली आहे. यावर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाचे सैनिक तयार असल्याचे म्हटले आहे.
एकीकडे दोन्ही देशांचे नेते परस्परविरोधी विधाने करत आहेत. तर दुसरीकडे रशियासमर्थक फुटिरवादी गट देखील युक्रेनमध्ये स्फोट घडवून आणत आहे. पूर्व युक्रेनमध्ये बंडखोरांच्या ताब्यातील शहरात अनेक स्फोट झाल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. मागील 24 तासांमध्ये रशिया समर्थक फुटिरवाद्यांकडून 12 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचे युक्रेनच्या सैन्याकडून शनिवारी म्हटले गेले आहे.
फुटिरवादी गट युद्धाच्या तयारीत
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धसदृश तणावादरम्यान रशिया समर्थक फुटिरवादी नेत्याने स्वतःच्या कथित सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. युक्रेनच्या डोनेट्स्क क्षेत्रात रशिया समर्थक फुटिरवादी सरकारचे प्रमुख डेनिस पुशिलिन यांनी एक विधान जारी करत स्वतःच्या कथित सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचा आदेश दिला. युक्रेनचे सैन्य आमच्या भागात मोठय़ा प्रमाणावर गोळीबार करत असल्याचा आरोप पुशिलिन यांनी केला आहे.
युक्रेनच्या एका सैनिकाचा मृत्यू
फुटिरवाद्यांच्या गोळीबारात एका युक्रेनियन सैनिकाचा मृत्यू झाला आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक फुटिरवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सैनिक मारला गेल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. फुटिरवाद्यांनी 20 हून अधिक नागरी वस्त्यांना लक्ष्य करत गोळीबार केला. तसेच रॉकेट्स डागल्याचे युक्रेनच्या सैन्याने फेसबुक पेजवर नमूद केले आहे. यापूर्वी पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक फुटिरवाद्यांनी एका कारला लक्ष्य केले होते. एका गॅस पाईपलाइनमध्ये स्फोट घडवून आणला गेला होता. या दोन्ही स्फोटांना रशियासोबतच्या युद्धाचा ट्रेलर म्हणून पाहिले जात आहे. युक्रेनने हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरले. तर रशियाने हा युक्रेनचा कट असल्याचे म्हटले आहे.
रशियाची लढाऊ विमाने तैनात
रशियाने युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या स्वतःच्या वायुतळावर मोठय़ा प्रमाणावर लढाऊ विमाने तैनात केल्याचे नव्या उपग्रहीय छायाचित्रांद्वारे स्पष्ट झाले आहे. तसेच तेथे सैनिक आणि चिलखती उपकरणांनाही तैनात करण्यात आले. याचबरोबर बेलारुस, क्रीमिया आणि पश्चिम रशियाच्या सीमेवरही सैन्य हालचाली सुरू आहेत.
रशिया खोटं बोलतोय!
रशिया खोटं बोलत असून जगाची दिशाभूल करत असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. रशियाच्या राष्ट्रपतींनी आम्हाला युक्रेनवर हल्ला करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगावे तसेच यासंबंधी आश्वासन द्यावे, असे बायडेन म्हणाले. पुतीन यांनी काही दिवसांपूर्वी सीमेवरून सैन्य मागे घेणार असल्याचे म्हटले होते.
फॉल्स फ्लॅगची रणनीति
सीमेवर तणावादरम्यान युक्रेनच्या पूर्व भागात होत असलेल्या हल्ल्यांकडे रशियाच्या फॉल्स फ्लॅग रणनीतिच्या स्वरुपात पाहिले जाते. फॉल्स फ्लॅगचा अर्थ एखादा देश प्रथम स्वतःच्या हिस्स्यात सुनियोजित हल्ला करतो आणि मग त्याचा दोष दुसऱया देशाच्या माथी मारून प्रत्युत्तरादाखल कारवाई करतो. अमेरिकेने रशियाच्या या रणनीतिसंबंधी नाटोला पूर्वीच सतर्क केले आहे.