युक्रेन युद्धात रशिया नवीनवी संहारक शस्त्रास्त्रे उपयोगात आणत आहे. यामध्ये काही रासायनिक शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे, असा आरोप युक्रेन आणि युरोपियन देशांनी रशिया आता फॉस्फरस बॉम्बचा उपयोग करीत आहे असा दावा युक्रेनने केला असून रशियाला रोखण्याची जगाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
विदेशी पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या बुधवारी रात्री रशियाने लुहान्स्क भागात फॉस्फरस बॉम्बचा मारा केला होता. फॉस्फरस बॉम्ब क्षेपणास्त्रांवर बसवून सोडण्यात आले होते. यामुळे मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी झाल्याचा आरोप आहे. फॉस्फरस बॉम्बमुळे विषारी वायुची निर्मिती होऊन मोठय़ा प्रमाणात संहार होतो.
अमेरिकेने रशियाच्या युद्धनितीवर चिंता व्यक्त केली. रशियाने रासायनिक शस्त्रांचा उपयोग केल्यास युद्धाला नवे घातक वळण लागेल. तसेच युरोपियन देशांना या धोक्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी नवी योजना करावी लागेल. युद्धाची व्यापती वाढविण्याचा प्रयत्न रशिया करत आहे. आणखी देश युद्धात समाविष्ट व्हावेत, अशी त्याची इच्छा आहे. आतापर्यंत युरोपियन देशांनी या योजनेत सापडणे टाळले आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असे मत व्यक्त होत आहे.
सहा हजार क्षेपणास्त्रे पुरविणार
ब्रिटन युक्रेनला लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरविणार आहे. युक्रेनची प्रतिकार करण्याची शक्ती वाढावी यासाठी हे साहाय्य केले जाणार आहे. लवकरच ही क्षेपणास्त्रे पोलंड किंवा हंगेरी मार्गे युक्रेनला देण्यात येतील. ब्रिटीश क्षेपणास्त्रे रणगाडे, चिलखती वाहने, आणि विमानांविरोधात उपयोगात आणली जाऊ शकतात.